दुश्मंथा चमीरा आणि वनिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter, PTI)

IPL 2021, RCB vs KKR Eliminator: आयपीएल (IPL) 2021 चा एलिमिनेटर सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) यांच्यात शारजाह येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचे (RCB) वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुश्मंथा चमीरा (Dushmantha Chameera) संघाच्या बायो बबलमधून बाहेर पडले आणि आता दोन्ही खेळाडू लवकरच राष्ट्रीय (T20 WC Qualifiers) संघात सामील होतील. श्रीलंकेला (Sri Lanka) या आठवड्याच्या अखेरीस टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धा खेळायची आहे. श्रीलंका संघ 18 ऑक्टोबर रोजी अबु धाबी येथे नामिबियाविरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आयपीएल 2021 च्या यूएई लेगपूर्वी विराट कोहलीच्या आरसीबीने हसरंगा आणि चमीरा या दोघांनाही बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले होते, हसरंगाने दोन सामने खेळले होते. तर चमीराला मात्र आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: प्लेऑफपूर्वीच KKR ला जोर का झटका, लीग फेरी संपताच स्टार अष्टपैलूने संघ सोडण्याचा घेतला निर्णय)

“वनिंदूं हसरंगा आणि दुशमंथा चमीरा यांना RCB च्या बायो बबल मधून रिलीज करण्यात आले आहे कारण ते श्रीलंका टीमसोबत त्यांच्या #WT20 क्वालिफायरसाठी सामील झाले आहेत. आम्ही दोघांना शुभेच्छा देतो आणि #IPL2021 दरम्यान त्यांच्या व्यावसायिकता आणि मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानतो,” RCB ने ट्विट केले. भारताविरुद्ध चमकदार कामगिरीमुळे हसरंगाला आरसीबीने त्यांच्या संघात सामील केले. त्याने घरच्या मालिकेत टीम इंडियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसीय सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी अंतिम 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका आणि इतर सात संघांना पात्रता फेरीत पहिल्या गटात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंका गट अ मध्ये आहे ज्यामध्ये आयर्लंड, नामिबिया आणि नेदरलँड्स आहेत.

श्रीलंकेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचे तर अबु धाबी येथे श्रीलंकेचा सामना 18 ऑक्टोबर रोजी नामिबियाशी होणार आहे. श्रीलंकेचा सामना 20 ऑक्टोबर रोजी आयर्लंडशी अबू धाबीमध्ये आणि शेवटचा सामना 22 ऑक्टोबरला शारजामध्ये नेदरलँडशी होईल. पहिल्या दोन क्रमांकाचे संघ सुपर 12 च्या फेरीत पुढे जातील.