मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामना आज अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. केकेआर (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 22 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने आजपर्यंत गतविजेते संघाविरुद्ध केवळ सहा विजय नोंदवले आहेत. केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) विक्रमही उत्कृष्ट आहे. जर रोहित या सामन्यात खेळला आणि 18 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर तो एक विशेष कामगिरीची नोंद करेल. आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठणारा रोहित पहिला फलंदाज बनेल. तसेच या सामन्यात मुंबईने विजय मिळवला, तर तो 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. दुसरीकडे, जर कोलकाता जिंकला तर तो चौथ्या स्थानावर पोहचेल आणि मुंबई टॉप-4 च्या बाहेर पडेल. (IPL 2021: आयपीएल 14 च्या दुसऱ्या सत्रासाठी सचिन तेंडूलकरने युएईमधून फोटो केला शेअर)

रोहितने आतापर्यंत केकेआरविरुद्ध 982 धावा केल्या आहेत. रोहितने केकेआरविरुद्ध चार वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात रोहित खेळू शकला नाही, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सला सीएसकेविरुद्ध 20 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होता. तसेच अनेक अहवालांनुसार रोहित केकेआरविरुद्ध हा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि अनमोलप्रीत सिंहच्या जागी क्विंटन डी कॉकसह डावाची सुरुवात करेल. रोहितच्या एकूण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 207 आयपीएल सामन्यांमध्ये 31.49 च्या सरासरीने 5480 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 40 अर्धशतके आहेत. रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल जेतेपद पटकावले आहे.

याशिवाय रोहित टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकार मारण्याच्या जवळ आहे. त्याने आतापर्यंत 350 टी-20 मध्ये 397 षटकार मारले आहेत. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात 3 षटकारांसह तो 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय ठरेल. टी -20 क्रिकेटमध्ये फक्त 4 फलंदाजांनी भारताकडून 300 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत रोहित नंतर सुरेश रैनाचे दुसरे नाव येते. रैनाने 331 टी -20 सामन्यांमध्ये 324 षटकार ठोकले आहेत.