IPL 2021 Auction: ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 2021 च्या आवृत्तीपूर्वी आयपीएलच्या लिलावासाठी (IPL Auction) नोंदणी करण्याचे संकेत दिले आहेत. बीबीएल (BBL) सामन्यानंतरच्या मुलाखतीत 26 वर्षीय ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) फलंदाजाने ‘महान स्पर्धेत’ भाग घेण्याच्या इच्छेविषयी आपले मत मांडले. इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होईल, आयपीएलने गेल्या आठवड्यात ट्विट केले. या मिनी लिलावात देश-विदेशातील अनेक युवा व अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत, बिग बॅश लीगमध्ये लाबूशेनने उत्कृष्ट कामगिरी केली आणि यंदाच्या मोसमात ब्रिस्बेन हीटसाठी तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करत सहा डावांमध्ये एकूण 176 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने आपल्या संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या. (IPL 2021 Auction: आयपीएल 14च्या लिलावात या 3 खेळाडूंना लागू शकतो 10 कोटींचा जॅकपॉट, जाणून भुवया उंचावतील)
बिग बॅश लीगदरम्यान एका मुलाखतीत लबुशेन म्हणाला की, “मी आयपीएलमध्ये माझे नाव नोंदवण्याचा विचार करत आहे. मी आधी म्हटलं आहे की आयपीएल ही एक जबरदस्त स्पर्धा आहे. व्यक्तिशः मला आयपीएल खेळायचे आहे पण पुढे काय होते ते पाहूया.” त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 18 कसोटी सामन्यात 60.8 च्या सरासरीने 1885 धावा केल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून 13 एकदिवसीय सामने खेळताना त्याने 39.4 च्या सरासरीने 473 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकांची नोंद आहेत. दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलची 14वी आवृत्ती एप्रिल ते मे विंडोमध्ये आयोजित होणार आहे, पण बीपीसीआयने आयपीएल 2021 चे ठिकाण व तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय खजिनदार अरुण धुमल यांनी गेल्या आठवड्यात कोविडची परिस्थिती भारतामध्ये सुधारत असल्याने आयपीएलचे आयोजन करण्यासाठी परदेशी जागेची पाहणी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. बीसीसीआयला महामारीमुळे युएईमध्ये झालेल्या मागील आवृत्तीपेक्षा आयपीएल 2021 चे आयोजन भारतात होईल असा विश्वास धुमल यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना व्यक्त केला.