IPL 2021: महाराष्ट्र सरकारचा निर्णय, वानखेडे येथे रात्री 8 नंतरही आयपीएल संघांना सराव करण्याची मिळाली परवानगी
Wankhede Stadium (Photo credits: Wikimedia Commons)

IPL 2021: कोविड-19 (COVID-19) प्रकरणात वाढ असूनही महाराष्ट्र सरकारने सोमवारी मुंबईत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 सामन्यांसाठी ग्रीन सिग्नल दिला असून मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रात्रीची संचार बंदी (Night Curfew) असताना देखील संघांना रात्री 8 पुढे सराव करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने महामारीवर प्रतिबंध घालण्यासाठी नाईट कर्फ्यू जाहीर केला असूनही संघांना स्टेडियममधून त्यांच्या संबंधित टीम हॉटेल्समध्ये जाण्याची परवानगी देखील दिली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोविड-19 (Maharashtra COVID-19 Cases) प्रकरणांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारने रविवारी 'ब्रेक द चेन' जाहीर केले, ज्याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 7 या दरम्यान कलम 144 आणि रात्री कर्फ्यू मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळपासून मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. (महाराष्ट्र: IPL 2021 पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी नाही- नवाब मलिक)

तथापि, महाराष्ट्र सरकारने आयपीएल संघांना मुंबईतील काही सवलतींना परवानगी दिली असली तरी त्यांना बायो-बबल आणि सोशल-डिस्टेंसिंग प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. आयपीएल 2021 चे आयोजन 9 एप्रिलपासून होणार आहे. मुंबईत पहिल्या दोन आठवड्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्ससह तब्बल 4 संघ आपले सामने खेळणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “सामन्याच्या वेळेचा विचार करता सीसीआय आणि एमसीए येथे सराव करणाऱ्या संघांनी दोन सत्रात सायंकाळी 4 ते 6.30 आणि सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या वेळेत सराव करावा लागतो. संघ आणि आयपीएल कर्मचार्‍यांना रात्री 8 नंतर मैदानात सराव करण्याची परवानगी मागितली गेली आहे आणि त्यांना वेळानंतर मोकळेपणाने मैदानातून आपापल्या हॉटेल्समध्ये जाऊ शकतील. त्यानुसार बायो-बबलचे अत्यंत सावध पालन करण्याच्या अधीन असलेल्या या विनंतीस परवानगी दिली जात आहे,” प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली एक प्रत या पत्रामध्ये नमूद केले आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे 10 सामने आयोजित करणार असून त्यातील नऊ सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत. वानखेडे येथे पहिला आयपीएल सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.