IPL 2021, KKR vs PBKS: पंजाबचा धडाकेबाज विजय, केएल राहुलच्या तुफानी फलंदाजीने कोलकाताला दिला पराभवाचा धक्का
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2021, KKR vs PBKS: कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) धुव्वा उडवला. कोलकाताने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवला. राहुलने पुढाकाराने नेतृत्व करत केले आणि अखेरीस 67 धावा करून परतला. राहुलने आपल्या खेळीत 52 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकार व 2 षटकार लगावले. तसेच शाहरुख खानने (Shahrukh Khan) 9 चेंडूत 22 धावा केल्या. याशिवाय मयंक अग्रवालने 40 आणि एडन मार्करमने 18 धावांचे योगदान दिले. शाहरुखने षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह पंजाबने प्लेऑफ शर्यतीत आपले आव्हान पल्लवित ठेवल्या आहेत. पंजाब आता गुणतालिकेत 10 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यावर गोलंदाज त्याचा बचाव करून केकेआरला विजय मिळवून देऊ शकले नाही. संघासाठी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (IPL 2021 Playoffs Race: आयपीएल प्लेऑफचे चित्र स्पष्ट, CSK ने जिंकली पहिली बाजी तर 6 संघात तिसऱ्या स्थानासाठी चुरशीची लढाई)

कोलकाताने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राहुल आणि मयंकची जोडी सलामीला उतरली. दोघांनी आक्रमक पवित्रा घेत संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मयंक झेलबाद झाला. त्यानंतर निकोलस पूरनला चक्रवर्तीने 12 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. मार्करम देखील राहुलला जास्त काळ खेळपट्टीवर साथ देऊ शकला नाही. सुनील नारायणने त्याला 18 धावांवर शुभमन गिलच्या हाती झेलबाद करून माघारी धाडले. यानंतर शिवम माविने अंतिम क्षणी दीपक हुड्डाला स्वस्तात बाद केले. अखेरीस राहुलने शाहरुख खानच्या साथीने संघाला विजय रेष ओलांडून दिली आणि कोलकाताला पराभवाचा जोराचा झटका दिला.

यापूर्वी टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या केकेआरसाठी सलामीवीर व्यंकटेश अय्यरने आपली शानदार लय कायम ठेवली. अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्यात 72 धावांची भागीदारीने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अय्यरने यादरम्यान आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्यानंतर कोलकाताच्या फलंदाजांना एकामागोमाग विकेट्स गमावल्या. नितीश राणाने 18 चेंडूत 31 धावा करुन विकेट गमावली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिष्णोईने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.