IPL 2021: Glenn Maxwell ने उघडलं गुपित, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीने RCB संघात सामील होण्याची दिली होती ऑफर
ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2021: भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) डिसेंबरच्या सुरूवातीच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) कांगारू संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxell) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात सामील होण्याबाबत चर्चा केली असल्याचं ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेलने उघड केलं. मॅक्सवेलने खुलासा केला की विराट कोहलीने त्याला सांगितले होते की आरसीबीमध्ये (RCB) अष्टपैलूचे असणे चांगले होईल पण लिलावाच्या अनिश्चिततेवर देखील प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, आरसीबी (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये ग्लेन मॅक्सवेलसाठी लिलावात चुरस रंगली, पण अखेरीस बेंगलोरने त्याच्या बेस किंमतीपेक्षा 7 पट जास्त रुपयात खरेदी केले. विशेष म्हणजे मॅक्सवेलने आयपीएल 2021 च्या लिलाव होण्यापूर्वीच आरसीबीकडून खेळण्याची आपली आवड दर्शविली होती. त्याने एबी डिव्हिलियर्स आणि भारतीय कर्णधार विराट यांच्याबरोबर खेळण्याची उत्सुकता दर्शविली होती. (IPL 2021: विराट कोहलीच्या निर्णयावर युवराज सिंहने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, RCB कॅप्टनने दिले स्पष्टीकरण)

“आमच्यात चर्चा झाली आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिका संपल्यानंतर कोहलीने मला संधी मिळाल्यावर आरसीबीकडून खेळण्यास सांगितले. तो म्हणाला की तू संघात सामील झालात तर छान होईल. पण आम्हाला लिलाव प्रक्रियेतून जावे लागेल.” तो म्हणाला, “कोहली म्हणाला आपल्या संघात सामील होणे चांगले होईल. त्याने ही कल्पना माझ्या मनात आणली. या प्रक्रियेस बराच वेळ लागला आणि मी आता आरसीबीकडून खेळत आहे याबद्दल मी त्याचे आभारी आहे.” मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्ज) कडून यापूर्वी खेळला होता परंतु यंदाच्या मोसमासाठी संघाने त्याला रिलीज केले आणि त्याला खेळाडूंच्या लिलावात तब्बल 14.25 कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल 2021ची मॅक्सवेलने शानदार सुरुवात करत 28 चेंडूत 39 धावा ठोकल्या.

दरम्यान, अ‍ॅडम झांपाने लिलाव होण्यापूर्वीच मॅक्सवेलला आरसीबी कॅप दिल्याची देखील एक रोचक घटना ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने सांगितली. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू म्हणाला की, कोहलीने झांपाने पाठवलेला फोटो पाहिला होता आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही क्रिकेटपटूंना प्रत्युत्तर पाठवले होते. कॅप सादरीकरणाच्या काही तासांनंतर आरसीबीने लिलावात मॅक्सवेलला खरेदी केले. “ही एक मजेदार कहाणी आहे. लिलावाचा दिवस हा न्यूझीलंडमध्ये रात्रीच्या वेळी होता. आम्ही न्यूझीलंडमध्ये क्वारंटाईनमध्ये प्रशिक्षण घेत होतो. अ‍ॅडम झांपाच्या बॅगमध्ये आरसीबीची टोपी होती, म्हणून त्याने ते बाहेर काढून आमच्या दोघांचा फोटो घेतला. त्याने हे विराटला पाठवलं आणि म्हणाला की चला त्याला आणूया. अभिनंदन मी आधीपासूनच त्याला त्याची पहिली आरसीबी कॅप दिली आहे! ते लिलावापूर्वी झाले होते, त्यामुळे सर्व सुरळीत झाले. जर त्याप्रमाणे झाले नसते तर ते खूप मुर्खासारखे दिसले असते. त्यानंतर त्याने तो फोटो ठेवला पण आम्ही लिलावापूर्वी फोटो काढला. विराटने सांगितले की तुम्ही लोक मूर्ख आहात पण सुंदरही,” मॅक्सवेलने पुढे म्हटले.