कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये जे दोन संघ जेतेपदाच्या लढतीत भिडतील ते निश्चित झाले आहेत. दोन वेळा आयपीएल (IPL) विजेते केकेआरने (KKR) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी केकेआरचा 15 ऑक्टोबर रोजी सामना तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सशी (Chennai Super Kings) होईल. गेल्या हंगामात गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेला CSK यंदा अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. तसेच केकेआरसाठी अंतिम फेरीचा रस्ता सोपा नव्हता. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात केकेआर संघाची गाडी रुळावरून घसरली. तथापि शेवटच्या 4 संघात स्थान मिळवण्यासाठी केकेआरने चांगला खेळ दाखवून सर्व सामने जिंकले आणि तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. 2104 मध्ये कोलकाताने अखेर आयपीएल फायनल (IPL Final) सामना खेळला होता. त्यानंतर आत तब्ब्ल सात वर्षांनी नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. (IPL 2021 Final: चेन्नईविरुद्ध फायनल लढतीपूर्वी आंद्रे रसेलच्या फिटनेसवर समोर आले मोठे अपडेट)

उल्लेखनीय म्हणजे, केकेआरने सीएसकेलाच पराभूत करून 2012 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले जोते. अशा स्थितीत पुन्हा एकदा केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनायचे असल्यास खाली दिलेल्या खेळाडूंनी कमाल करणे गरजेचे आहे.

व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

या युवा अष्टपैलू खेळाडूने आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करत चमकदार कामगिरी केली आहे. अय्यरने 9 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 320 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने गोलंदाजी करून 3 विकेट्सही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे अय्यरचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे. अंतिम सामन्यातही केकेआरला व्यंकटेश अय्यरकडून मोठ्या अपेक्षा असतील.

सुनील नारायण

सोमवारी खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात केकेआरचा दिग्गज गोलंदाज सुनील नारायणने जबरदस्त वैयक्तिक कामगिरी केली. आरसीबीविरुद्ध नारायणने चार षटकांत 21 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. त्यानंतर जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने पहिल्या 3 चेंडूत 3 उत्तुंग षटकार खेचले. त्यामुळे जर CSK ला अंतिम सामन्यात पराभूत करायचे असेल तर सुनील नारायणच्या फिरकीची जादू खूप महत्वाची आहे. तसेच त्याला बॅटने देखील आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे आहे.

वरुण चक्रवर्ती

यंदाच्या हंगामात चक्रवर्तीने प्रभावी गोलंदाजी केली आहे. बुधवारी खेळलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात वरुणने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि दिल्लीला पाच बाद 135 धावांवर रोखले. चक्रवर्ती एक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि CSK विरुद्ध त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे केकेआर वरुण चक्रवर्तीवर अवलंबून असेल.