कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाच्या जवळ आल्यानंतर पराभवाला सामोरे जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) पुढील वर्षी आपला संघ जोरदार पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली. संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करून पहिल्या दोनमध्ये असलेल्या दिल्लीला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून 4 विकेटने पराभवाचा धक्का बसला. नाईट रायडर्सला (केकेआर) 136 धावांचे सोपे लक्ष्य देऊनही गोलंदाजांनी दिल्लीला सामन्यात पुनरागमन करून पण निर्णायक क्षणी केकेआरसाठी राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) जबरदस्त षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. केकेआरला (KKR) शेवटच्या दोन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज होती आणि दिल्ली फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हॅटट्रिकवर होता, पण त्रिपाठीने षटकारासह केकेआरला विजय मिळवून दिला. केकेआरविरुद्ध पराभवानंतर दिल्लीचे अनेक खेळाडू भावुक झालेले दिसले. (IPL 2021: एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 सामना जिंकून फायनल गाठणारा KKR तिसरा संघ, दोन माजी चॅम्पियन टीम यादीत सामील)
पंत म्हणाला, “सामन्यानंतर काहीही बदलू शकत नाही. आम्हाला शेवटच्या मिनिटापर्यंत सामन्यात रहायचे होते. गोलंदाजांनी आम्हाला सामन्यात परत आणले आणि मधल्या षटकांमध्ये चमकदार गोलंदाजी केली. फलंदाज स्ट्राईक रोटेट करण्यात अपयशी ठरले.” पंत पुढे म्हणाला, “आशा आहे की आम्ही पुढच्या वर्षी जोरदार पुनरागमन करू. आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगले क्रिकेट खेळलो आणि एकमेकांना आधार दिला. पुढच्या वर्षी अधिक चांगले खेळू.” या पराभवानंतर दिल्लीचा युवा कर्णधार पंत खूप निराश दिसला. प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. ओलसर डोळे, आणि भारी मनाने त्याने जबाबदारी पार पाडली. पंतने चाहत्यांना वचन दिले की पुढील वर्षी संघ पुन्हा मजबूत होईल.
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) क्वालिफायर-2 सामना खूपच रोचक होता. कोलकाताने दिल्लीला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि आता त्यांची टक्कर एमएस धोनीच्या टीम चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होईल. कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना खूपच रोचक होता. 17 व्या षटकापर्यंत हा सामना केकेआरच्या बाजूने एकतर्फी दिसत होता, पण दिल्ली गोलंदाजांनी संघाला जबरदस्त पुनरागमन केले आणि केकेआरला संघर्ष करायला भाग पाडले. उल्लेखनीय म्हणजे दिल्ली गोलंदाजांनी केकेआरच्या मधल्या फळीतील फलंदाज- दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, सुनील नारायण आणि शाकिब अल हसन यांना शून्यावर माघारी धाडले होते.