IPL 2021: युएईच्या मैदानावर Chris Gayle याला खुणावतोय 'हा' विशेष रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरेल तिसरा विदेशी फलंदाज
क्रिस गेल (Photo Credit: PTI)

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये (IPL) धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. गेल आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचा एक भाग आहे. गेल जेव्हा दुसऱ्या लेगसाठी मैदान उतरेल तेव्हा त्याची नजर एका विशिष्ट रेकॉर्डवर असेल. आणि स्टार खेळाडूंनी सजलेल्या आयपीएल फलंदाजांच्या यादीत आपले नाव सामील करण्यासाठी उत्सुक असेल. गेल आयपीएलमध्ये 5000 धावा करण्यापासून फक्त 50 धावा दूर आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब किंग्स युएई येथे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्स विरोधात 21 सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना खेळेल. या सामन्यात जर गेलने 50 धावा केल्यावर तो 5,000 धावा करणारा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा विदेशी क्रिकेटपटू बनू शकतो. (IPL च्या इतिहासात सर्वाधिक ‘या’ संघाने केली शतके, CSK 5 व्या तर KKR शेवटच्या स्थानी)

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) यांनी धावांचा हा एव्हरेस्ट सर केला आहे. डिव्हिलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 5056 धावांची नोंद केली आहे, तर वॉर्नरने 5447 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गेलने आतापर्यंत आयपीएलच्या 140 सामन्यांच्या 139 डावांमध्ये एकूण 4950 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 175 (पुणे वॉरियर्स विरुद्ध 2013 मध्ये) होता. गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये सहा शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान गेलने आतापर्यंत 404 चौकार आणि 357 षटकार मारले आहेत. इतकंच नाही तर गेल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. गेलच्या मागे एबी डिव्हिलियर्स (245) आणि रोहित शर्मा (224) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दुसरीकडे, लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात गेलने आठ सामन्यांत केवळ 178 धावा केल्या आहेत. त्याने एकही अर्धशतक केले नाही. पहिल्या लेगमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 46 होती. गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील संघ सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सने पहिल्या टप्प्यातील आठ पैकी तीन सामने जिंकले आणि पाच सामने गमावले आहेत. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईत खेळला जाईल.