IPL 2021: विराट कोहलीच्या RCB संघाला मोठा धक्का, मुंबई इंडियाविरुद्ध लढतीला मुकणार प्रमुख विदेशी खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या सामन्याला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झांपा (Adam Zampa) मुकणार असल्याचे संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन (Mike Hesson) यांनी बुधवारी सांगितले. “आमच्याकडे पहिल्या सामन्यासाठी परदेशी खेळाडूंची पूर्ण तुकडी उपलब्ध होणार नाही. अ‍ॅडम झांपा लग्न करीत आहे. हा त्याच्यासाठी महत्वाचा काळ आहे आणि ही अशी एक गोष्ट आहे जी फ्रँचायझी म्हणून आम्हाला माहित आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो व त्याचा चांगला वेळ जावा अशी आम्ही आशा करतो. त्यामुळे, जेव्हा तो आमच्यात सामील होतो, तेव्हा तो पुन्हा फ्रेश असेल आणि उर्वरित स्पर्धेत भरीव योगदान देईल,” फ्रॅंचायझीने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन म्हणाले. हेसन म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचसह कर्मचारी अद्याप चेन्नई येथे पोहोचू शकत नाहीत जेथे प्रशिक्षण शिबिरासाठी संघ क्वारंटाइन आहे. (IPL 2021: RCB ने रिटेन करत AB de Villiers 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा बनला पहिला विदेशी क्रिकेटर, टॉप-3 मध्ये भारतीयांचे अधिराज्य)

“लोकांना ऑस्ट्रेलियामधून बाहेर काढणे हे एक आव्हान होते. सायमन बऱ्याच काळापासून जाण्यासाठी तयार आहे, विमानातून आमच्यामध्ये सामील होण्यास दोन दिवस लागतील. कागदपत्र थोडे आव्हानात्मक होते,” हेसन म्हणाले. 9 एप्रिल रोजी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीचा गतजेत्या मुंबई इंडियन्सशी लढत होणार आहे. झांपाने यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला Hattie Palmer हिच्याशी लग्न करणार असल्याचं घोषित केलं होतं. आयपीएलमध्ये येण्यापूर्वी खेळाडूंना सात दिवसांच्या उपांत्यपूर्व फेरीत रहावे लागणार आहे, आता झंपा पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, माईक हेवसनने एबी डिव्हिलियर्ससह आरसीबीच्या खेळाडूंवर भारत गाठण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “1 एप्रिलपासून आमच्या संघाचे खेळाडूंच्या आगमनास सुरुवात होईल. फिन अ‍ॅलन न्यूझीलंडसाठी 1 एप्रिलपर्यंत टी-20 सामन्यात व्यस्त असेल आणि त्यानंतर ते आयपीएलसाठी भारतात येतील. डॅनियल सॅम्स आणि केन रिचर्डसनसारखे ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील त्याच वेळी दाखल होतील. एबी डिव्हिलियर्स 28 मार्च रोजी येत आहे.”

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. झांपा आरसीबीचा प्रमुख गोलंदाज असून आपल्या लेगस्पिनद्वारे भल्या-भल्या फलंदाजांचा घाम फोडण्याची क्षमता त्याच्यात आहे. झांपा मागील तीन वर्षांपासून आयपीएल खेळत असून त्याने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये 14 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 21 विकेट घेतल्या आहेत.