IPL 2021 खेळून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना घरी परतल्यावर भरावा लागू शकतो 50 लाखांचा भारी दंड, वाचा काय आहे नक्की प्रकरण
ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 मोसमात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंना मायदेशी परत जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या वृत्तानुसार या खेळाडूंना एकाकी ठिकाणी ठेवले जाईल आणि त्यांच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. खेळाडूंना तुरुंगवासही होऊ शकतो असे देखील अहवालात म्हटले आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या (Sydney Morning Herald) अहवालात म्हटले आहे की, भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करणाऱ्यांवर दंड थोपवण्याचा आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत फेडरल सरकार विचार करीत आहे. सध्या 14 ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स भारतात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळत आहेत. यामध्ये डेविड वॉर्नर (David Warner), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), ग्लॅम मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यासारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे. (IPL 2021: डेविड वॉर्नरने मैदान सोडल्यास ‘हे’ 3 बनू शकतात Sunrisers Hyderabad च्या कर्णधार पदाचे दावेदार)

“देशातील कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर जो कोणी भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल त्याला दंड आणि तुरुंगवास देण्याचा विचार फेडरल सरकार करीत आहे,” सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या एका अहवालात म्हटले आहे.  ऑस्ट्रेलियनही आयपीएलच्या विविध फ्रँचायझीच्या कोचिंग / सपोर्ट स्टाफ आणि टीव्ही कमेंटरी टीमचा देखील भाग आहेत. यामध्ये रिकी पॉन्टिंग, डेविड हसी, ब्रेट ली आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश आहे. “9 न्यूजने शुक्रवारी रात्री दिलेल्या वृत्तानुसार, भारतातुन प्रवास करत असल्यास त्यांच्यावर $66,000 दंड किंवा पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा देऊन गुन्हा ठरवण्याच्या सरकार पुढील चरणांवर विचार करीत आहे,” अहवालात पुढे म्हटले आहे.

विदेशात 36,000 ऑस्ट्रेलियन अडकले आहेत, तर क्रिकेटपटूंसह भारतामध्ये एकूण 9,000 ऑस्ट्रेलियन रहिवाशी आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पूर्वी सांगितले होते की, खेळाडू आयपीएलसाठी खासगीपणे भारत दौर्‍यावर असल्याने त्यांना स्वतः परतीची खात्री करुन घ्यावी लागेल. मॉरिसन यांनी गार्डियनच्या वृत्तानुसार म्हटले, “त्यांनी तिथे खासगी प्रवास केला आहे. हा ऑस्ट्रेलियन दौर्‍याचा भाग नव्हता. ते त्यांच्या स्वत: च्या संसाधनांखाली आहेत आणि तेही ती संसाधने वापरत असतील, मला खात्री आहे की त्यांच्या स्वत: च्या व्यवस्थेनुसार ते ऑस्ट्रेलियाला परत येतील,” अहवालात म्हटले. आयपीएलमधील तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू- अ‍ॅडम झांपा, केन रिचर्डसन आणि अ‍ॅन्ड्र्यू टाय हे यापूर्वीच कतारमार्गे मायदेशी परतले आहेत.