IPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द
Indian Premier League Trophy (Photo Credits: IANS)

भारत सरकारकडून यंदा युएई (UAE) येथे होणाऱ्या आयपीएल 2020 (IPL 2020), स्पर्धेसाठी अधिकृत परवानगी दिल्यानंतर, आयपीएलचे सामने खेळले जातील. मात्र एका मोठ्या समस्येमधून बाहेर पडतोय न पडतोय, तोपर्यंत बीसीसीआय (BCCI) सामोरे नवीन समस्या उभी राहिली आहे. कॅश-रिच लीगचा मुख्य प्रायोजक असलेला विवो (Vivo) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर आता यंदाच्या आयपीएलच्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा हॉटस्टार-जिओ टीव्ही (Hotstar–Jio TV) यांचा करार मोडला आहे. मार्चमध्ये हॉटस्टारच्या माध्यमातून जिओ टीव्हीवर थेट आयपीएल सामने प्रक्षेपित करण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या.

परंतु त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये करार झाला नाही व आता माहिती मिळत आहे की, हा करार रद्द करण्यात आला आहे. परंतु इंडिया डॉट कॉमकडे एका तज्ञाने म्हटले आहे की, ‘आत्ता जरी हा करार रद्द झाला असला तरी, शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते.'

हा करार रद्द झाल्याने होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा करताना, इसोबार इंडियाचे सीईओ गोपा कुमार म्हणाले की, 'यावर्षी जिओबरोबर कोणताही करार झालेला नसल्याने, हॉटस्टारचा रिचही कमी होणार आहे. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये हॉटस्टारने प्रयत्न करून त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढवली आहे. अनेक नवीन लोक त्यांच्या व्यासपीठाशी जोडले गेले असेल, तरी त्यांना जिओ टायअपपासून जे काही मिळाले असते त्याच्या जवळपासही सध्या हॉटस्टार नाही.' यावरून असे दिसत आहे की, जिओशी करार मोडल्याने हॉटस्टारचे नुकसान होणार हे नक्की. (हेही वाचा: आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी 'अनअकॅडेमी' लावणार बोली; ड्रीम11 आणि पेटीएम देखील शर्यतीत)

दरम्यान, यंदाचा आयपीएल 2020 हा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा भारताबाहेर होणार आहे आणि यूएईतर्फे ही स्पर्धा खेळवण्याची दुसरी वेळ आहे. 2014 मध्ये, प्रत्येक फ्रँचायझीने संयुक्त अरब अमीरातमध्ये त्या वेळच्या स्पर्धेचे पहिले पाच सामने खेळले होते आणि उर्वरित लीग भारतात खेळली गेली होती.