IPL 2020 Qualifier 1: मुंबईच्या गोलंदाजांपुढे दिल्लीची घसरगुंडी, MI ने कॅपिटल्सवर 57 धावांनी मोठा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा बुक केलं फायनलचं तिकीट
मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 Qualifier 1: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला 143 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि 57 धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्लीविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवत मुंबईने सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) धडक मारली. मुंबईने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीसाठी मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) एकाकी झुंज दिली आणि सर्वाधिक 65 धावा केल्या. अक्षर पटेलने (Axar Patel) 42 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर 12 धावा करून परतला. दिल्लीवर यंदाच्या स्पर्धेतील मुंबईचा हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी साखळी फेरीत देखील मुंबईने दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव करत वर्चस्व गाजवले होते. दुसरीकडे, मुंबईसाठी पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीला धावांवर गुंडाळले. बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर ट्रेंट बोल्टने  2, कृणाल पांड्या आणि किरोन पोलार्ड यांना प्रत्येकी  1 विकेट मिळाली. (IPL 2020: DC विरुद्ध रोहित शर्मा 'गोल्डन डक'वर बाद; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने केली हरभजन सिंह, पार्थिव पटेलच्या 'नकोशा' रेकॉर्डची बरोबरी)

मुंबईच्या गोलंदाजांनी संघाला तुफानी सुरुवात करून आणि आघाडीच्या तीनही फलंदाजांच्या शून्यावर माघारी धाडलं. बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला बाद केलं, तर बुमराहने पुढील ओव्हरमध्ये शिखर धवनला स्वस्तात बाद केलं. कर्णधार श्रेयसही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. बुमराहच्या चेंडूवर श्रेयस 12 धावांवर रोहित शर्माकडे कॅच आऊट होऊ माघारी परतले. रिषभ पंतने 3 धावा केल्या. स्टोइनिस आणि अक्षर पटेलने संघाला शंभरी पार करून देत डाव सावरला. या दरम्यान स्टोइनिसने अर्धशतक केले. स्टोइनिसने 65 धावा केल्या. नंतर बुमराहने डॅनियल सॅम्सला बाद करून चौथी विकेट घेतली. बुमराहने 14 धावांवर 4 विकेट घेतल्या. अखेरीस अक्षर नाबाद आणि कगिसो रबाडा नाबाद धावा करून परतले. दुसरीकडे, आजच्या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीकडे फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची आणखीन एक संधी असेल. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील विजेत्या संघाशी दिल्ली दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

यापृवी, दिल्लीविरुद्ध पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी दिल्ली गोलंदाजांची धुलाई करत 5 बाद 200 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवने 51 तर अंतिम ईशान किशनने नाबाद 55 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 37 धावांचे योगदान दिले. ईशान आणि हार्दिकच्या जोडीने 23 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला 201 धावांचं तगडं आव्हान दिलं.