IPL 2020 in UAE: इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी; आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची माहिती
IPL 2020 (Photo Credits : Twitter /@IPL)

भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलचा तेरावा हंगाम (IPL Season 13) आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारकने (Central Government) बीसीसीआयला (BCCI) हिरवा कंदिल दाखवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये (UAE) करण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी दिली आहे. यामुळे आयपीएल चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सर्व नियमांचे पालन केल्यानंतर 20 ऑगस्टनंतर सर्व संघाना यूएईमध्ये रवाना होण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, आयसीसीने टी-20 विश्वचषक 2020 स्थगिती दिली आहे. यामुळे यावर्षी आयपीएल होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, काही दिवसांनंतर बीसीसीआयने आयपीएल यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भारतातील कोणतीही स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी मिळणे आवश्यक असते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने स्पर्धेला तत्वतः मान्यता दिली होती. यानंतर गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर यंदाच्या आयपीएलवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Sponsorship Update: आयपीएल टायटल स्पॉन्सरच्या लढतीत बाबा रामदेवची उडी, 'पतंजली' लावू शकते बोली- रिपोर्ट

एएनआयचे ट्वीट-

आयपीएल यूएईमध्ये खेळवण्याची पहिली वेळ नाही. याआधी 2014 साली आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये पार पडली असून तब्बल 20 सामने या देशात पार पडले होते. महत्वाचे म्हणजे 2014 मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. युएइच्या खेळपट्टीवर आजवर एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे फलंदाजही या पीचवर धावा करण्यात अपयशी झाले आहेत.