IPL 2020 (Photo Credits : Twitter /@IPL)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या दरम्यान जगात अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशात भारतामधील आयपीएल (Indian Premier League) बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र युएई (UAE) मध्ये यंदाचे आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यासाठी रविवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पार पडली. यामध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान आयपीएल होणार असल्याचे  निश्चित करण्यात आले आहे. भारत सरकारनेही बीसीसीआयला (BCCI) मंजुरी दिली आहे. यंदाच्या सिझनमध्ये 10 डबल हेडर्स सामने खेळवले जातील, म्हणजेच दिवसात दोन सामने असतील. संध्याकाळचे सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरु होतील.

आयपीएलचा फायनल सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल, म्हणजे पहिल्यांदाच हा सामना आठवड्याच्या शेवटी (Weekend) ला खेळवला जाणार नाही. याआधी बातमी आली होती की आयपीएलची अंतिम लढत 8 नोव्हेंबरला होईल. प्रेक्षकांच्या उपस्थितीबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की, युएई बोर्डाशी चर्चा झाल्यानंतरच यावर निर्णय घेण्यात येईल. चिनी कंपनीबरोबर झालेल्या करारासह लीगचे सर्व प्रायोजक कायम ठेवले जातील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

जगभरातील आरोग्याशी संबंधित सध्याची नाजूक परिस्थिती लक्षात घेता, कोविड-19 मुळे खेळाडूंना बदलण्यात येईल, जे अमर्याद असेल. त्याचबरोबर जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी भारतीय कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर फ्रँचायझींना व्हिसा प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. बीसीसीआयला क्रीडा मंत्रालयाकडून आयपीएलच्या संघटनेसाठी मान्यता मिळाली आहे आणि उर्वरित विभागांकडूनही लवकरच मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान महिला चॅलेंजर स्पर्धा होण्याची शक्यता)

आयपीएलच्या जीसी सदस्याने सांगितले की, आम्हाला एका आठवड्यात गृह व परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची आशा आहे. दिवाळीचा काळ लक्षात घेता अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे, जेणेकरून प्रायोजकांना व प्रसारकांना एक आकर्षक संधी उपलब्ध होईल.