भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या (Commonwealth Games 2022) त्यांच्या तिसऱ्या सामन्यात बार्बाडोस (Barbados) संघाचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून (Australia) हरला होता. मात्र त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा (Pakistan) आठ विकेट्स राखून पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होणार आहे. जर भारताने उपांत्य फेरीत विजय मिळवला तर ते अंतिम फेरीत आणि हरले तरी पदकाच्या शर्यतीत कायम राहील. फायनलपूर्वी रविवारीच ब्राँझपदकाची लढत होणार आहे. बर्मिंगहॅममध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 बाद 162 धावा केल्या आणि त्यानंतर बार्बाडोस संघाला 20 षटकांत 8 बाद 62 धावांवर रोखले.
भारतातर्फे रेणुका सिंह ठाकूरने प्राणघातक गोलंदाजी करताना चार षटकांत 10 धावा देऊन चार बळी घेतले. 1998 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला तेव्हा भारतीय पुरुष संघाने फक्त एकच सामना जिंकला आणि उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. आता भारतीय महिला संघाने त्यांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली आहे.
रेणुका ठाकूरने घेतले चार बळी
भारताकडून मिळालेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोसची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. बार्बाडोससाठी किशोना नाइट आणि शकीरा सेलमन यांनी अनुक्रमे 16 आणि नाबाद 12 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून रेणुकाने अप्रतिम गोलंदाजी करताना चार बळी घेतले. ठाकूरने डिआंड्रा डॉटिन, कर्णधार हेली मॅथ्यूज, किसिया नाइट आणि आलिया अॅलन यांना आपले शिकार बनवले. त्यांच्याशिवाय मेघना सिंह, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (हे देखील वाचा: BCCI Announce Team India Schedule: बीसीसीआयने आगामी भारत दौऱ्यांचे वेळापत्रक केले जाहीर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी करणार दोन हात)
भारताने 4 गडी गमावून 162 धावा केल्या
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 4 गडी गमावून 162 धावा केल्या. संघाकडून शफाली वर्माने 26 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्जने 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. दीप्ती शर्मानेही नाबाद 34 धावा केल्या. जेमिमाचे हे सातवे अर्धशतक आहे. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली.