भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ आज दुसऱ्या वनडे सामन्यात आमने-सामने आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया आणि विंडीज मधील दुसरा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात खेळाला जात आहे. आजच्या या सामन्यात 19 धावा करत विराटने पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) यांचा 26 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडून काढला आहे. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. आणि आता विराटने फक्त 34 डावांत 19 धावा करत मियांदादचा रेकॉर्ड मोडला आहे. विराटने विंडीज विरुद्ध वनडे सामन्यात सार्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. मियांदादनी विंडीजविरुद्ध फक्त एक शतक आणि 12 अर्धशतकं केली आहेत. (IND vs WI 2nd ODI मॅचआधी रिषभ पंत याने शेअर केला हॉटेलमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ, 'गर्लफ्रेंड' ईशा म्हणाली-मिस यू, पहा Video)
आजवर विडिंजविरुद्ध कोहलीने 33 डावांमध्ये 1931 धावा केल्या आहेत. विराट अजूनदेखील फलंदाजी करत आहे. त्यामुळे तो विंडीजविरुद्ध अजून धावा जोडेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये सात शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. विडिंजविरुद्ध टीम इंडियाच्या सर्वाधिक धावांमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. सचिनने 39 डावांत 1573 धावा केल्या आहेत. तर द्रविडने 38 डावात 1348 धावा केल्या आहे. दरम्यान, विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 106 धावा केल्या. तर दोन्ही संघामध्ये कीरोन पोलार्ड याने 115 धावा केल्या आहेत. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. त्यानंतर पहिल्या वनडे सामन्यात पावसाने खोडा घातला आणि 13 ओव्हरनंतर सामना रद्द करण्यात आला.
दुसरीकडे, आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्न असेल. तर भारतविरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळत असलेला ख्रिस गेल (Chris Gayle) याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीची धुरा युवा खेळाडू रिषभ पंत आणि अय्यर यांच्या खांद्यावर असणार आहे.