भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) विश्वचषक सामन्यात भारताचा निम्मा संघ फक्त 71 धावात बाद झाला. मंगळवारी सामना सुरू झाला पण त्यात पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर 46.1 षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 चेंडूत 28 धावा करून 240 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवलं आहे. याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 80 धावात बाद झाले. टीमला पाचवा झटका बसला तो रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या रूपात. मात्र, पंत आऊट झाल्यावर असे काही झाले की ज्याची कोणीही अपेक्षा केली नाही. (IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: दिनेश कार्तिक याला माघारी धाडण्यासाठी जिमी निशाम याने घेतला अफलातून झेल, पहा Video)

22 ओव्हरच्या 5 चेंडूवर पंत मोठा शॉट खेळण्याच्या नादात कॉलिन डी ग्रँडहोम च्या हाती सीमा रेषेजवळ झेल बाद झाला. पण, पंतच्या विकेट नंतर ड्रेसिंग रूमच्या इथे विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये कोहली कोच शास्त्री यांच्याकडे आपला संताप व्यक्त करताना दिसतोय. पंत बाद झाल्यानंतर कोहलीला राग आला आणि त्याने शास्त्रींकडे तक्रार केली असं म्हटलं जात आहे. पहा हा व्हिडिओ:

दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज- रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट, के. एल राहुल (KL Rahul) फक्त एक धाव काढून बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या साथीने चांगली भागिदारी असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंड्या देखील मोठा शॉट मारण्याच्या नादात 62 चेंडूत 32 धावा करत झेल बाद झाला.