India vs England Women's Tri-Series 2020: भारतीय महिला संघाची इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिकेत विजयी सुरुवात, हरमनप्रीत कौर ची नाबाद बॅटिंग
हरमनप्रीत कौर (Photo Credit: Getty)

भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) कॅनबरा येथील मानुका ओव्हलमध्ये महिला टी-20 तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड (England) महिलांविरुद्ध पाच विकेटने विजय मिळवला आणि महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 34 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिली तर दीप्ती शर्माने (Deepti Sharma) आठ चेंडूत 12 धावा केल्या. इंग्लंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया, या जगातील पहिल्या दोन संघांविरुद्ध खेळत भारताला आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC World Cup) स्पर्धेची तयारी करण्याची उत्तम संधी मिळेल. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी तो निर्णय योग्य ठरवलं आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 147 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार हीथर नाइट ने 67 धावांचा डाव खेळला. इंग्लंडची सलामी जोडी अ‍ॅमी जोन्स आणि डॅनी व्याट काही खास खेळ करू शकले नाही. इंग्लंडविरुद्ध राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

इंग्लंडकडून नताली सायव्हर 20, टैमी ब्यूमोंट 37 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, भारताचीही चांगली सुरुवात झाली नाही. 27 धावांवर स्मृती मंधानाच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. स्मृती 10 चेंडूत 15 धावा करून माघारी परतली. त्यानंतर शाफाली वर्माने 30 धावा केल्या. 82 च्या धावसंख्येवर भारताला तिसरा धक्का बसला. जेमीमाह रॉड्रिग्ज ने 26 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने नाबाद 42 धावा केल्या. संघाने महत्वाचे विकेट गमावल्यावर हरमनप्रीतने सूत्र हाती घेत संघाला विजयी सुरुवात करून दिली. वेदा कृष्णमूर्ती 7 आणि तानिया भाटिया 11 धावा केल्या. दीप्तीने गोलंदाजीनंतर बॅटनेही चांगला खेळ केला आणि हरमनप्रीतला साथ देत नाबाद 12 धावा केल्या.

टीम इंडियाचा पुढील सामना बलाढ्य यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. त्यापूर्वी, 1 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील.