भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दुसरा कसोटी सामना १२ ऑक्टोबर पासून हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. भारताने याआधी पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीज संघाचा एक डाव आणि २७२ रन्सने धुव्वा उडवला होता. कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतलं चोविसावं शतक साजरं केलं आणि मुंबईच्या प्रिथवी शाॅने आपल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून विक्रमाची नोंद केली.
इंडीज संघाने कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन समोर नांगी टाकली. यादवने दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. वेस्ट इंडीजचा संघ हा नवखा असून त्यांना ह्या कसोटीत चमत्कार करावा लागेल. तरच हा सामना जिंकता येईल.
भारतासाठी मयंक अगरवाल आणि मोहम्मद सिराज यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. इंग्लंड दौऱ्यात संधी मिळालेल्या हनुमा विहारीला अजिंक्य राहणेच्या जागी संघात स्थान मिळू शकतं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सकाळी ९:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.