
Mohammad Azharuddin on Team India: हेडिंग्ले येथील पराभव विसरून टीम इंडिया एजबॅस्टनमध्ये जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) कामाचा ताण पाहता दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. पहिल्या कसोटीत बुमराह हा एकमेव गोलंदाज होता जो चांगल्या लयीत दिसला. बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या. त्यावर, भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी मत व्यक्त करत, भारतीय संघाने (IND vs ENG) बुमराहवर जास्त अवलंबून राहू नये असे म्हटले. त्याशिवायय, संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादवला संधी द्यावी असाही सल्ला दिला.
बुमराहवर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही
पीटीआयशी बोलताना मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले, "भारतीय संघ बुमराहवर जास्त अवलंबून आहे. हे सोपे नाही, कारण तुम्हाला अधिक अनुभवी गोलंदाजांची आवश्यकता आहे. टीम इंडियाने कोणत्याही परिस्थितीत कुलदीप यादवला खेळवावे." अझरुद्दीनचा असा विश्वास आहे की संघात एका फिरकी गोलंदाजाचा समावेश केल्याने भारतीय संघाची गोलंदाजी अधिक संतुलित होईल. माजी कर्णधाराने पहिल्या कसोटीतील पराभवासाठी भारतीय खेळाडूंना जबाबदार धरले. ते म्हणाला, "डळमळीत गोलंदाजीमुळे हेडिंग्ले येथे हरलो, पण आता संघाने योग्य खेळाडू निवडले पाहिजेत. गोलंदाजी परिपूर्ण असावी."
पहिल्या कसोटीत पराभव
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. तथापि, इंग्लिश संघाने केवळ 5 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. बेन डकेटने संघासाठी शानदार फलंदाजी केली आणि 149 धावांची शानदार खेळी केली. जो रूट आणि जॅक क्रॉलीनेही अर्धशतके झळकावली. दोन्ही डावांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती.