शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा (Photo Credit: PTI)

IND W vs ENG W Test 2021 Day 3: फॉलोऑन खेळणार्‍या भारतीय महिला संघाने (India Women's Team) ब्रिस्टलच्या (Bristol) काउंटी क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शुक्रवारी पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसर्‍या डावात एक विकेट गमावून 83 धावा केल्या आहेत. पावसामुळे दिवसाचा खेळ लवकर संपुष्टात आला तेव्हा शेफाली वर्मा (Shafali Verma) 55 आणि अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) 18 धावा करून खेळत होत्या. शेफालीने 63 चेंडूत आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.  टीम इंडिया (Team India) अद्यापही ब्रिटिश संघाच्या 82 धावांनी पिछाडीवर आहेत. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 396/9 धावसंख्येवर डाव घोषित केला होता, तर आज पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 231 धावांवर आणि यामुळे यजमान संघाला 165 धावांची मोठी आघाडी मिळाली व त्यांनी भारताला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. (IND W vs ENG W Test 2021: 17 वर्षीय Shafali Verma हा कमाल करणारी बनली पहिली भारतीय महिला, इंग्लंड विरोधात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड)

पहिल्या सत्रानंतर पावसामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाला परंतु चहाच्या वेळानंतर सामना पुन्हा पावसाने एंट्री घेतली आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ रोखण्यात आला. दिवसाखेर शेफालीने 68 चेंडूंत 11 चौकारांसह 55 धावा आणि दीप्ती शर्मा दोन चौकारांच्या मदतीने 66 चेंडूंत 18 धावा करून खेळत आहेत. इंग्लंडकडून कॅथरीन ब्रंटला आतापर्यंत एक विकेट मिळाली आहे. फॉलोअन खेळणाऱ्या भारतीय संघाला स्मृती मंधानाच्या रूपात पहिला धक्का बसला. पहिल्या डावात अर्धशतकी कामगिरी करणारी स्मृती दुसऱ्या डावात 8 धावाच करू शकली. तत्पूर्वी, भारतीय संघाने पहिला डाव पाच बाद 187 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. हरमनप्रीत कौरने चार धावा आणि दीप्तीने खाते न उघडता डावाची सुरुवात केली.

हरमनप्रीतने 4 धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर टीमने तानिया भाटिया (0) आणि स्नेह राणाच्या (2) विकेट्स देखील गमावल्या. पूजा वस्त्राकरने दीप्तीबरोबर काही चांगली फलंदाजी केली,परंतु काही वेळानंतर तीही 33 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 12 धावा करून माघारी परतली. त्यानंतर झुलन गोस्वामी शेवटची फलंदाज म्हणून बाद झाली तर दीप्ती 73 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 29 धावा करून नाबाद राहिली. दुसरीकडे, इंग्लंडसाठी सोफी इक्लेस्टोनने चार आणि कर्णधार हेदर नाइटने दोन विकेट्स घेतल्या तर कॅथरीन, अन्या श्रुबसोल, नताली सायव्हर आणि केट क्रॉस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.