भारतीय क्रिकेट संघ आज राजीव गांधी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळणार आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने यंदाच्या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौर्यावर तिन्ही फॉर्मेटमध्ये क्लीन स्वीप केले होते. मॅचपूर्वी दोन्ही संघ सराव करताना दिसले. मालिकेचा पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सोशल मीडियावर त्याचा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतानाच फोटो शेअर केला. या फोटोवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डेनिएल वैट (Danielle Wyatt) हिने मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि चहलला ट्रोल केले. यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी चहलला संघात स्थान मिळाले नव्हते. (मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराह याला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अब्दुल रज्जाक याला 'बेबी बॉलर' वक्तव्यासाठी केले ट्रोल, पाहा Tweet)
चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या फोटोवर बर्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीम इंडियाचे फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) याने प्रतिक्रिया देत लिहिले की, 'काय चिंताजनक दिसत आहे... पण इंग्लंडची फलंदाज डेनिएलची टिप्पणी सर्वात वेगळी होती. चहलच्या पोस्टवर लिहिले- "बोल्ड..." चहल हा टीम इंडियाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. पण, त्याला काही काळ संघाबाहेर रहावे लागले कारण संघातील फलंदाजीवर व्यवस्थापनाला जास्त लक्ष द्यायचे होते.
दरम्यान, चहलने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 3 बळी घेतले तर भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेण्याचा विक्रम नोंदवू शकतो. चहलने भारताकडून 34 टी-20 सामन्यात एकूण 50 विकेट घेतले आहेत. सध्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन भारताकडून टी-20 विकेटच्या बाबतीत आघाडीवर आहेत. बुमराहने 51 तर अश्विनने 52 विकेट घेतले आहेत. भारताकडून 50 टी-20 विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे.