IND vs SL U19 World Cup 2020: भारत अंडर-19 संघाची विश्वचषकात विजयी सलामी, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 90 धावांनी केले पराभूत
भारत अंडर-19 संघ (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकच्या (World Cup) पहिल्या सामन्यात भारताने (India) श्रीलंकेला (Sri Lanka) 90 धावांनी पराभूत केले. रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या ब्लॉफोन्टेन येथे खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाने 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 297 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेचा संघ 45.2 षटकांत 207 धावांवर ऑलआऊट झाला. सिद्धेश वीर (Siddhesh Veer) याने भारताकडून सामन्यात अष्टपैलू खेळ केला. त्याने 44 धावा केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. वीरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. गतजेता भारतीय संघाने गटातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेसामोरे 298 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाकडून सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने 59 आणि कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) याने 56 धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरल (Dhruv Jural) 52 धावांवर नाबाद परतला. टिळक वर्माने 46 धावांचे योगदान दिले. फिरकी गोलंदाज सिद्धेश आणि रवी विश्नोई (Ravi Bishnoi) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दुसरीकडे श्रीलंकेकडून निपुण धनंजयने सर्वाधिक 50 धावा केल्या. याशिवाय रवींदू रासंताने 49 धावांचा खेळ केला. श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले, मात्र त्यांचा तो निर्णय अयोग्य ठरला. यशवी आणि दिव्यांश सक्सेना (Divyansh Saxena) यांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात दिली. दिव्यांश 27 चेंडूत तीन चौकार मारत एकूण 23 धावांवर बाद झाला. यानंतर टिळक आणि यशवीने ही धावसंख्या 100 च्या पार पोहचवली. यशस्वी 74 चेंडूत आठ चौकाराच्या मदतीने एकूण 112 धावांवर बाद झाला. भारताची तिसरी विकेट टिळकच्या रूपात 171 धावांवर पडली. टिळकने 53 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार ठोकले. संघाची धावसंख्या 297 पर्यंत पोहोचविण्यात सिद्धेशने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने 27 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 44 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून एम्सी डी सिल्वा, एशियान डॅनियल, दिलशान मदुसांका आणि कविंदू नदीशन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

टीम इंडियाचा या स्पर्धेतील पुढील सामना 21 जानेवारी रोजी जपान अंडर-19 संघाविरुद्ध माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेनमध्ये खेळला जाईल.