Indian Cricket Team Players (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्यामध्ये पहिले फलंदाजी करत श्रीलंकेने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 बाद 142 धावा केल्या आणि टीम इंडियासमोर 143 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेकडून कुशल परेरा (Kusal Perera0 याने सर्वाधिक 34 धावा केल्या. अविष्का फर्नांडो याने 22 आणि दनुष्का गुणथिलाका याने 20 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याने सर्वाधिक 3, कुलदीप यादव, आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2, तर वॉशिंग्टन सुंदर, आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. शार्दुलने 19व्या षटकात 3 गडी बाद केले. त्याने डी सिल्वा आणि उदानाला बाद केले, त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने श्रीलंकेचा कर्णधार मलिंगालाही बाद केले.श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि लाहिरू कुमारा (Lahiru Kumara) अनुक्रमे 16 आणि 0 धावांवर नाबाद परतले. (IND vs SL 2nd T20I: विराट कोहली याने हरभजन सिंह याची केलेली नक्कल पाहून गोलंदाजालाही झाले हसू अनावर, पाहा Video)

फर्नांडो आणि गुणथिलाका या दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, पण अविष्काला 22 धावांच्या वैयक्तिक धावांवर वॉशिंग्टन सुंदर याने सैनीकडे झेलबाद करत भारताला पहिले यश दिले. त्यानंतर श्रीलंकेचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. श्रीलंकेच्या संघाला गुणथिलाकाच्या रुपात आणखी एक धक्का बसला. सैनीने दनुष्काला 21 चेंडूत 20 धावांवर बोल्ड केले. ओशादा फर्नांडो याच्या रूपात श्रीलंकेला आणखी एक धक्का बसला. फर्नांडोने 10 धावा केल्या आणि यादवने पंतकडे झेलबाद केले. कुलदीपने श्रीलंकेला चौथा धक्का दिला आणि कुसल परेराला 34 धावांवर पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. धनंजया डी सिल्वा याने अखेरीस 17 धावांचे योगदान दिले. शार्दूलने डी सिल्वाला सैनीकडे कॅच आऊट करत त्याला माघारी धाडले.

इंदोरमधील आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. मागील सामन्याप्रमाणेच या वेळीही विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेऊ इच्छित असेल.