श्रीलंका क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs SL 2021: भारताविरुद्ध (India) पहिल्या टी-20 सामन्यात पराभवानंतर दुसऱ्या निर्णायक सामन्यापूर्वी यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाला आणखी तीन मोठा फटका बसला आहे. भारताविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाचे (Sri Lanka Cricket Team) तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडिया (Team India) सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मॅच-विनिंग 65 धावांच्या खेळी दरम्यान हार्दिक पांड्याचा चेंडू बोटाला लागलेल्या भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. स्कॅनमुळे त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आणि यामुळं त्याला पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याला बाहेर बसण्यास भाग पाडले होते. शिवाय, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 24 वर्षीय चरित असलांकाचे खेळणे देखील संशयास्पद आहे. (Krunal Pandya Test COVID Positive: भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी-20 सामना स्थगित)

असलंका श्रीलंकेकडून वनडे सामन्यात 3 डावात सर्वाधिक 127 धावा करणारा फलंदाजच नाही तर पहिल्या टी-20 सामन्यात त्याने सर्वात जास्त 44 धावा देखील काढल्या. पहिल्या टी-20 सामन्यात त्याने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची तक्रार केली होती. आणि अखेर रविवारी नेट्स सत्रादरम्यान फलंदाज पथम निसंनकाच्या हाताला दुखापत झाली होती. यजमान संघ सध्या त्याच्या स्कॅनच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत पण तो देखील मंगळवारी मैदानात उतरण्याची शक्यता कमीच दिसत आहे. इंग्लंडमधील बायो-बबलचा भंग केल्याबद्दल निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलका यांना निलंबित केल्यामुळे श्रीलंकेकडे फक्त मोजके अनुभवी फलंदाज शिल्लक राहिले आहेत. इंग्लंड दौर्‍यावर एकाही सामना जिंकण्यात संघ अपयशी ठरला होता. तर घरच्या मैदानावरही त्याने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर आज टी-20 मालिका वाचवण्याचा यजमान संघाचा निर्धार असेल.

मंगळवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांतील मालिकेचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. तसेच आतापर्यंत श्रीलंकेला फक्त निसंनका आणि सदेरा समरविक्रम म्हणून संघात अतिरिक्त फलंदाज आहेत व एकाच वेळी तीन दुखापती आधीच विजयासाठी धडपणाऱ्या संघासाठी घातक धक्का ठरू शकतो. दरम्यान, असलंका जर दुसऱ्या सामन्याला मुकला तर यजमान संघासाठी तो मोठा धक्का ठरेल कारण यापूर्वी पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 26 चेंडूत 44 धावांची झुंजार खेळी केली होती.