IND vs SA 2nd Test Day 1: भारताविरुद्ध जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वाँडरर्स स्टेडियमवर यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पकड मिळवली आहे. टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेला टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 202 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 18 षटकात एक विकेट गमवून 35 धावा केल्या असून ते भारतीय संघाच्या (Indian Team) आणखी 167 धावांनी पिछाडीवर आहेत. डीन एल्गर 11 धावा आणि कीगन पीटरसन 14 धावा करून खेळत आहेत. तिसऱ्या सत्रात फलंदाजीला आलेल्या आफ्रिकी संघाने एडन मार्करमची विकेट गमावली. मार्करम फक्त 7 धावत करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहला एकमात्र विकेट मिळाली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळत केएल राहुलने संघासाठी सर्वाधिक 50 धावा केल्या, तर यजमान संघासाठी मार्को जॅन्सनने 4 विकेट घेतल्या. (IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात भारत 202 धावांवर ढेर, दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडिया धुरंधर फेल)
या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात राहुल वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि भारताचा डाव 202 धावांवर आटोपला. राहुलने आपला शानदार फॉर्म इथेही कायम ठेवला आणि 13 वे तर कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक झळकावले. राहुलचा सलामी जोडीदार मयंक अग्रवाल 26 धावाच करू शकला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे फ्लॉप सत्र यंदाही सुरूच राहिले. ऑलिवरने पुजाराला 3 धावा तर रहाणेला सलग चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सामन्यात कोहलीच्या जागी हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र पहिल्या डावात तो 20 धावा करून बाद झाला. राहुलने 50 धावा केल्या आणि जेन्सेनच्या चेंडूवर रबाडाकडे झेलबाद झाला.
Stumps on day one in Johannesburg 🏏
An enthralling day of play!#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/RsSonickbK
— ICC (@ICC) January 3, 2022
रिषभ पंतने लढा देण्याचा प्रयत्न केला पण फक्त 20 धावा करून झेलबाद झाला. शार्दुल ठाकूर तर भोपळाही फोडू शकला नाही. मोहम्मद शमीने 9 धावा केल्या तर अश्विन 46 धावा करून बाद झाला. सिराज 1 धावेवर बाद झाला, तर बुमराह 14 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात जॅन्सनव्यतिरिक्त रबाडा आणि ऑलिवरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. गोलंदाजांच्या खेळीनंतर आता फलंदाजांवर भारताविरुद्ध संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असेल.