IND vs NZ 1st Test Day 5: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतीय गोलंदाजांच्या अथक प्रयत्नांनंतरही किवी संघ सामना ड्रॉ करण्यात यशस्वी राहिला आहे. दिवसाच्या अंतिम सत्रात भारताने सामन्यावर पकड मिळवली होती पण अष्टपैलू रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) चिकट फलंदाजीपुढे यजमान गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले परिणामी सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिद्धिमान साहाच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर किवी संघाला 284 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात 81 षटकात वर्ल्ड चॅम्पियन संघ 9 विकेट गमावून 165 धावाच करू शकला. न्यूझीलंडसाठी अष्टपैलू रचिन रवींद्र आणि फिरकीपटू एजाज पटेल अखेरपर्यंत तळ ठोकून खेळत राहिले जेव्हा खराब प्रकाशामुळे दिवसाच्या खेळावर ब्रेक लागला. भारताकडून आर अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंड संघाने 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार खेळ दाखवत एक बाद 4 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. लॅथम आणि सोमरविल यांनी 31 षटकांत 75 धावा जोडल्या. मात्र, उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर उमेशने 36 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नाईट वॉचमन सोमरविलला शुभमन गिलकडे झेलबाद केले. अश्विनने लॅथमचा 52 धावांवर त्रिफळा उडवून अश्विनने यजमानांना तिसरे यश मिळवून दिले. शेवटच्या दिवशी टी ब्रेकपूर्वी जडेजाने भारताला चौथे यश मिळवून दिले आणि रॉस टेलरला 2 धावांवर पायचीत केलं. यानंतर चहापानानंतर लगेचच पटेलने भारताला पाचवे यश मिळवून दिले. पटेलने हेन्री निकोल्सला 1 धावेवर एलबीडब्ल्यू आऊट केले आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. जडेजाने भारताला सहावे आणि मोठे यश मिळवून देत किवी कर्णधार विल्यमसनला पायचीत करून तंबूत धाडले. यासह भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. मोक्याच्या क्षणी अश्विनने टॉम ब्लंडेलला दोन धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
New Zealand survive and it's a DRAW in Kanpur.
Scorecard - https://t.co/WRsJCUhS2d #INDvNZ @Paytm pic.twitter.com/TDTrEcl9ec
— BCCI (@BCCI) November 29, 2021
सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने 345 धावा केल्या. यात श्रेयसचे शतक, गिल आणि जडेजाच्या अर्धशतकांचा समावेश होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे भारताला 49 धावांची आघाडी मिळाली, तर अय्यर आणि रिद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसरा डाव 234/7 धावांवर घोषित केला. आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते.