भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंडविरुद्ध भारताने विजयासह मालिकेची सुरुवात केली.  न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्कमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने (India) यजमान किवी संघाचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर विजयासाठी 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुल (KL Rahul) याने 56 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 45 धावा केल्या. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इश सोधी 2, मिशेल सॅटनर, ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये पाच गडी गमावून 203 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मनीष पांडे (Manish Pandey) नाबाद परतले. श्रेयसने 29 चेंडूत 58 , तर मनीषने 14 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने सर्वात मोठे ध्येय गाठले. मागील वर्षाच्या सुरुवातीस याच मैदानावर त्यांनी 159 धावांचे लक्ष्य गाठले होते. टीम इंडियाने एकूण चौथ्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे.  (Video: रोहित शर्मा याची 'सुपरमॅन' उडी, जबरदस्त कॅच पकडत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याला केले बाद)

204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून राहुल आणि श्रेयसने तुफानी अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. भारताला पहिला धक्का रोहित शर्मा च्या रूपात बसला. रोहित 6 चेंडूत 7 धावा करून टेलरकडे संटनेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट आणि राहुलमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. मात्र, 27 चेंडूत 56 धावांची खेळी खेळल्यानंतर राहुल सोधीचा शिकार बनला. कर्णधार कोहली अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 45 धावा करून मार्टिन गप्टिलकडे कॅच आऊट झाला. शिवम दुबेच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. दुबेने 13 धावा केल्या आणि ईश सोधीच्या चेंडूवर साऊथीकडे झेलबाद झाला.

भारताकडून जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी 1-1 गडी बाद केले. किवी संघाकडून कॉलिन मुनरो 59, कर्णधार केन विल्यमसन ने 51 धावांची तुफानी खेळी केली, तर रॉस टेलर 54 धावांवर नाबाद राहिले. या मालिकेचा पुढील सामना रविवारी 26 जानेवारीला याच मैदानावर खेळला जाईल.