भारत U19 क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

U19 World Cup 2022 Final: कर्णधार यश धुलच्या (Yash Dhull) युवा भारतीय शिलेदारांनी इतिहास घडवला आणि अँटिग्वाच्या (Antigua) सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंडर-19 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर (England) मात करून स्पर्धेचे रेकॉर्ड पाचवे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी भारताने अंडर-19 विश्वचषकचे (Under-19 World Cup) चार वेळा (2000, 2008, 2012, 2018) विश्वविजेतेपद मिळवलं आहे. इतकंच नाही तर कर्णधार यश धुलने देखील संघाचे पुढाकाराने नेतृत्व केले आणि संघाला विजयीरेष ओलांडून दिली. युवा टीम इंडियाच्या या पाचव्या विजेतेपदासह कर्णधार यश धुलने इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. धुल अंडर-19 विश्वचषक जिंकणारा दिल्लीचा (Delhi) तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी उन्मुक्त चंद आणि विराट कोहली या दिल्लीच्या मुलांनी टीम इंडियाला (Team India) अंडर-19 चॅम्पियनशिपचा मान मिळवून दिला आहे.

दरम्याम, भारतीय संघाच्या जेतेपदाच्या प्रवासाबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने कोविड-19 च्या आव्हानावर ही मात केली. गयाना  सामन्यानंतर ते आयर्लंडविरुद्ध सामन्यासाठी त्रिनिदादला गेले. या प्रवासादरम्यान कर्णधार यश धुल याच्यासह भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे नियमांनुसार त्यांचं विलगीकरण करण्यात आलं. सहा खेळाडू कोरोनामुळे बाहेर पडल्यामुळे उर्वरित 11 खेळाडूंना आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरणं भाग होतं. तथापि खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने या आव्हानाला सकारात्मकतेने हाताळले आणि आयर्लंडविरुद्ध जबर्दत विजय मिळवला. त्यानंतर कोविड-19 चा मनस्थितीवर परिणाम होऊ न देता युगांडा संघाविरुद्ध सामन्यातही भारतीय संघाला सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नसतानाही संघाने उत्तम कामगिरी केली. दरम्यान एका आठवड्या नंतर परिस्थिती पूर्ववत झाली.

दुसरीकडे, फायनलपर्यंत अजेय राहिलेल्या इंग्लंडचे स्वप्न एका पराभवामुळे भंग झाले. 24 वर्षानंतर इंग्लंड संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यांनी 1998 मध्ये पहिले विजेतेपद जिंकले होते आणि यावेळी त्यांचे लक्ष दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे होते. मात्र भारतीय शिलेदारांच्या जबरदस्त खेळीपुढे युवा ब्रिटिश खेळाडूंनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण अखेरीस त्यांच्या पदरी पराभवाची निराशा आली.