India Cricket Team vs Australia National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरला पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू कॅमेरून ग्रीन जखमी झाला होता. ग्रीन आता भारताविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यातूनही ग्रीन बाहेर आहे.  (हेही वाचा -  IND vs AUS 2024-25: आगामी बॉर्डर गावस्कर मालिकेत भारत ऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी सामना खेळणार, वेळापत्रक आले समोर)

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ग्रीनला दुखापत झाली होती. या सामन्यात ग्रीनने 42 धावांची इनिंग खेळली होती. यासोबतच दोन विकेट्सही घेतल्या. मात्र तो जखमी झाला. ग्रीन पाठदुखीची तक्रार करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ग्रीन सध्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे.

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला होता. मालिकेतील दुसरा सामना 68 धावांनी जिंकला. तिसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून इंग्लंडने हा सामना 46 धावांनी जिंकला. मालिकेतील चौथा सामना इंग्लंडने 186 धावांनी जिंकला.

ग्रीनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 28 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 626 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. ग्रीनने 20 विकेट्सही घेतल्या आहेत. ग्रीनने 28 कसोटी सामन्यात 1377 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये चौथा सामना खेळवला जाणार आहे. शेवटचा सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे.