IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या डावात फलंदाजी करत लंचपर्यंत मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 64 ओव्हरमध्ये 182 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियाविरुद्ध (Team India) 276 धावांची आघाडी घेतली आहे. लाबूशेनने 73 धावा केल्या स्मिथ नाबाद 58 धावा आणि कॅमरुन ग्रीन नाबाद 20 धावा करून खेळत आहेत. लाबूशेन आणि स्मिथच्या शतकी भागीदारीने कांगारू संघाची दुसऱ्या डावात आघाडी दोनशे पार नेण्यास महत्वाची भूमिका बजावली. स्मिथने सिडनी मैदानावरील आपला उत्तम फॉर्म कायम ठेवत 133 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या गाठली. यापूर्वी स्मिथने पहिल्या डावात 131 धावांचा मोठा डाव खेळला होता. दुसरीकडे, नवदीप सैनीने संघासाठी पहिल्या सत्रात दोन मोठ्या विकेट घेतल्या. सैनी वगळता मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: दुखापतींच्या चक्रात अडकलेल्या टीम इंडियासाठी खुशखबर, 'हा' स्टार खेळाडू बॅटिंगसाठी सज्ज)
ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करत केलेल्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. अशाप्रकारे, यजमान संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 96 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात कांगारू संघाने 29 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 103 धावा केल्या होत्या. त्यानंतर चौथ्या दिवशी लाबूशेन आणि स्मिथ यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारीने टीम ऑस्ट्रेलियाला प्रभावी स्थितीत पोहचवले. लाबूशेनने 118 चेंडूत 73 धावा फटकावल्या. दिवसाच्या पहिल्या सत्रात सैनीने संघाला दोन यश मिळवून दिले. सैनीने लाबूशेनला विकेटच्या मागे रिद्धिमान साहाकडे कॅच आऊट केले. त्यानंतर सैनीने मॅथ्यू वेडला 4 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवत कांगारू संघाला दुसरा झटका दिला. यानंतर स्मिथने मालिकेतील आणि सामन्यातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.
दरम्यान, टीम इंडियासाठी पहिल्या डावात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी 50 धावा केल्या. शिवाय, दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाण्यापूर्वी रिषभ पंतने 36 तर रवींद्र जडेजाने नाबाद 28 धावा केल्या. पॅट कमिन्सने कांगारू संघासाठी सर्वाधिक 4 गडी बाद केले.