IND vs AUS 2nd ODI: भारतविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने (Australian Team) पुन्हा एकदा तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आणि 3 विकेट गमावून टीम इंडियासमोर (Team India) 390 धावांचे विशाल आव्हान ठेवले. यजमान कांगारू संघासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) शतकी खेळी केली. स्मिथने 104 धावांचा डाव खेळला आणि संघाच्या धावसंख्येत महत्वाची भूमिका बजावली. विद्यमान कर्णधार आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी पुन्हा संघाला शानदार सुरूवात करून देत प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. फिंच 60 तर वॉर्नर 83 धावा करून माघारी परतला. मधल्या फळीत स्मिथला मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) चांगली साथ दिली. लाबूशेन 70 धावा आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) नाबाद 63 धावा करून परतला. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. गोलंदाज पॉवर-प्लेमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले ज्याचा फटका संघाला बसला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd ODI: श्रेयस अय्यरच्या Bulls-Eye ने डेविड वॉर्नर रनआऊट होऊन माघारी, पाहून तुम्हीही म्हणाल WOW!)
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत फिंच आणि वॉर्नरने सावध सुरुवात केली पण, वॉर्नरने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत 39 चेंडूत अर्धशतक केले. या दरम्यान वॉर्नरने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. फिंच आणि वॉर्नरमध्ये पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी झाली. वॉर्नर फटकेबाजी करत असताना एक बाजू धरत फिंचनेही अर्धशतक पूर्ण केले. पण अखेरीस शमीने ही भागीदारी मोडली. शमीच्या गोलंदाजीवर खेळताना फिंचचा अंदाज चुकला, चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उडाला आणि कर्णधार विराट कोहलीने चूक न करता झेल पकडला. त्यानंतर जडेजाच्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात वॉर्नरही धावबाद होऊन माघारी परतला. दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतल्यावर स्मिथ आणि लाबूशेनने सावध फलंदाजी केली.
स्मिथने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत सिडनीच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि पहिल्या सामन्यातील शतकी खेळीची पुनरावृत्ती केली. मात्र, दुखापतीच्या अनेक दिवसांनंतर गोलंदाजी करण्यास आलेल्या हार्दिक पांड्याने 64 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावांवर स्मिथला माघारी धाडलं. आघाडीचे फलंदाज माघारी परतले असतानाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. लाबूशेन आणि मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या अडचणीत वाढ केली.