Jay Shah (Photo Credit - X)

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) हे आयसीसीचे (ICC) अध्यक्ष (ICC Chairman) बनणार असल्याची चर्चा वाढत आहे. अलीकडेच, विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी 30 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या शर्यतीपासून स्वतःला दूर केले होते, त्यानंतर जय शाह पुढील आयसीसी अध्यक्ष बनण्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma आणि Jay Shah यांची T20 World Cup Trophy घेऊन सिद्धिविनायक मंदिरास भेट)

जय शहा यांना बहुतांश सदस्यांचा आहे पाठिंबा

जय शाह यांनी जागतिक क्रिकेट मंडळ चालवण्याची जबाबदारी स्वीकारणार की नाही हे अद्याप स्पष्ट केले नसले तरी, शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास त्यांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहा यांना 16 पैकी 15 आयसीसी बोर्ड सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते परंतु त्यांना हे पद स्वीकारायचे आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे 96 तासांपेक्षा कमी वेळ आहे. त्याचवेळी, बीसीसीआय सचिव म्हणून त्यांच्या सलग दुसऱ्या कार्यकाळात अजून एक वर्ष बाकी आहे. आयसीसीचे नवे अध्यक्ष 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील.

'या' चेहऱ्यांना मिळू शकते जबाबदारी

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले तर बीसीसीआयमध्ये शाह यांची जागा कोण घेणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण ते आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी अद्याप त्यांच्या तत्काळ योजना जाहीर केल्या नाहीत. तथापि, दावेदारांमध्ये राजीव शुक्ला, आशिष शेलार, अरुण धुमाळ यांसारख्या नावांचा समावेश आहे जे सध्या शाह यांच्यासह बीसीसीआयचे अधिकारी आहेत.

ही नावे सरप्राईज पॅकेज ठरू शकतात

राजीव शुक्ला हे प्रदीर्घ काळ बीसीसीआयमध्ये आहेत आणि शाह यांच्या जागी त्यांचे नाव दिल्यास क्वचितच कोणाचा आक्षेप असेल. शुक्ला सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. दुसरीकडे, बोर्डाचे खजिनदार आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासनातील मोठे नाव आहेत. त्याचबरोबर आयपीएलचे अध्यक्ष धुमाळ यांनाही बोर्ड चालवण्याचा अनुभव आहे. याशिवाय अशी काही नावेही समाविष्ट आहेत जी सरप्राईज पॅकेज ठरू शकतात. यामध्ये संयुक्त सचिव देवजीत सैकिया, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविशेक दालमिया यांचा समावेश आहे.