ICC Cricket World Cup 2019: 'टीम इंडिया'चे कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यातील नात्याबद्दल केला मोठा खुलासा
Virat Kohli and MS Dhoni (Photo Credits- PTI)

ICC Cricket World Cup 2019: आयपीएल 2019 ची धूम संपल्यानंतर आता क्रिकेटर्संना वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी सांगितले. क्रिकेटनेक्सट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सांगितले की, "भारतीय संघ अतिशय लवचिक असून कोणताही खेळाडू कोठेही खेळू शकतो. आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे. फक्त येथून जाण्याचे काम बाकी आहे."

संघात चौथ्या स्थानावर खेळवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या निवड समितीने मात्र चौथ्या स्थानासाठी विजय शंकर याची निवड केली आहे. आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये विजय शंकर अपेक्षेस पात्र ठरु शकला नाही. त्याने 15 सामन्यात केवळ 244 धावा केल्या.

कर्णधार विराट कोहली आणि टीमचा अनुभवी खेळाडू महेंद्र सिंग धोनी यांच्यात खूप सामंजस्य असून दोघेही टीमच्या यशासाठी काम करतात. त्यांच्यातील सन्मान पाहून मला कसलीही शंका येत नाही, असे शास्त्री यांनी सांगितले. मी दोघांसाठी देखील चांगले काम करु इच्छितो. मी जेव्हा पहिल्यांदा संघांशी जोडलो गेलो होतो तेव्हा धोनी कर्णधार होता आणि दुसऱ्यांदा टीमशी संलग्न झालो तेव्हा कर्णधारपदाची सुत्रं कोहलीच्या हाती होती. त्यामुळे दोघांमध्ये असलेल्या ताळमेळाची मला कल्पना आहे.

धोनीच्या कारकीर्दीवर टीममधील सर्वच खेळाडूंना अभिमान आहे आणि संघ कायमच त्याच्याकडून काही ना काही तरी शिकत असतो. धोनीच्या कर्तुत्वाची कल्पना प्रत्येकाला असून तो संघात असल्याचा सर्वांनाच अभिमान आहे. फलंदाजी करताना धोनीची असणारी शांत प्रवृत्ती आणि विकेटकिपिंकचा जोश यातून संघ बरंच काही शिकतो.

पुढे शास्त्री म्हणाले की, संघात सर्व खेळाडू एकसारखे असून फायदा नाही. त्यामुळे विराटकडे जोश, उत्साह आहे, धोनीकडे धैर्य आहे. प्रत्येक खेळाडू वेगळा आहे. रोहित, शिखर धवन वेगळे आहेत. कुलदीप, हार्दिक पांड्या निराळे आहेत. कोणत्याही टीमला अशा प्रकारच्या खेळाडूंची आवश्यकता असते.