India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (India vs England ) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा टी20 सामना 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळला गेला. हा सामना असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिका 3-1 अशी जिंकली. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) चमकदार कामगिरी करून दाखवली. त्याने स्फोटक अर्धशतक झळकावून आपल्या नावावर एक खास विक्रम केला.
हार्दिक पंड्याचा ऐतिहासिक विक्रम
हार्दिक पांड्याने या सामन्यात 30 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. ज्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक होते. या खेळीसह, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1500+ धावा, 50+ विकेट्स आणि 5 अर्धशतके झळकावण्याचा अनोखा विक्रम रचला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी फक्त शाकिब अल हसन (बांगलादेश), मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनीच ही कामगिरी केली आहे.
100 विकेट्सचा विक्रमही जवळ
हार्दिक पांड्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने आणखी 6 विकेट्स घेतल्या तर तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1000+ धावा करणारा आणि 100+ विकेट्स घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनेल. ही कामगिरी करणारा तो जगातील फक्त दुसरा खेळाडू असेल. याआधी हा विक्रम फक्त शाकिब अल हसनच्या नावावर होता.