File Image | Harbhajan Singh | (Photo Credits: IANS)

2016 पासून टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. यानंतर तो कोणत्यातरी आयपीएल (IPL) फ्रँचायझीचा सपोर्ट स्टाफ किंवा प्रशिक्षक बनू शकतो. मेगा लिलावातही हरभजन त्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भज्जी पुढील आठवड्यात निवृत्तीची अधिकृत घोषणा करू शकतो. 41 वर्षीय हरभजन आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. मात्र, त्याला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हरभजनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता.

आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘हरभजनची नवी भूमिका मार्गदर्शक किंवा सल्लागार गटाचा भाग असू शकते. त्याचे ज्या फ्रेंचायझीशी बोलणे चालू आहे त्यांना हरभजनच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा आहे. लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रँचायझीला मदत करण्यातही तो सक्रिय भूमिका बजावेल.’ हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे.

त्यापैकी मुंबई आणि चेन्नई येथे त्याने विजेतेपद पटकावले. आयपीएल 2021 मध्ये KKR सोबत त्याला ट्रॉफी जिंकण्याची संधी होती पण संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. त्याने आयपीएलमध्ये 163 सामने खेळले आणि 150 विकेट घेतल्या. 18 धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तसेच 833 धावा केल्या. हरभजन सिंगने टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 417 विकेट आहेत. वनडेमध्ये त्याने 236 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. भज्जीने टी-20 मध्ये भारतासाठी 28 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत. (हेही वाचा: Sachin Tendulkar ची लेक Sara Tendulkar चं मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण; Banita Sandhu, Tania Shroff ची पहा ही जाहिरात)

पंजाबच्या हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याचवेळी भज्जीने 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचा शेवटचा वनडे सामना 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. 2016 मध्ये हरभजनने आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.