Sachin Tendulkar Nearly Unbreakable Records: आजचा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. आज ‘क्रिकेटचा देव’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 48वा वाढदिवस आहे, क्रिकेटचा देव सचिन आज 48व्या वर्षात पदार्पण करतोय. भारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या देवाचा आज वाढदिवस. सचिनने क्रिकेट रसिकांसह अनेकांच्या मनात त्याच्या अफलातून फलंदाजीने वेडे केले. म्हणूनच जेव्हा सचिनने क्रिकेटमधून संन्यास घेतला तेव्हा मात्र सर्वांनाच अश्रू अनावर झाले. क्रिकेटच्या खेळपट्टीवर तब्बल दोन दशकाहून अधिक वेळ राज्य करणारा विक्रमादित्य सचिनच्या वयाची 47 वर्षे पूर्ण झाली आणि आज तो 48व्या वर्षात पदार्पण करत आहे. (Sachin Tendulkar Birthday Special: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अखेरपर्यंत या मैदानावर टेस्ट शतक करण्याचे स्वप्न राहिले अधुरे)
सचिन टीम इंडियासाठी (Team India) 400 हून अधिक एकदिवसीय, 200 कसोटी सामने खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 18, 426 धावा, तर कसोटी सामन्यामध्ये 15,921 धावांचा डोंगर सचिनने उभारला आहे. सचिन तेंडुलकरच्या आज 48व्या वाढदिवसानिमित्त आपण मास्टर-ब्लास्टरच्या असे 5 रेकॉर्ड्स जाणून घेणार आहोत जे कोणत्याही फलंदाजाला मोडणे कठीण होईल.
1. सचिनने आपल्या अतुलनीय कारकीर्दीत 200 कसोटी सामने खेळले, जे खरोखरच एखाद्या खेळाडूच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्यामुळे हा रेकॉर्ड मोडणे जवळपास अशक्य होईल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
2. सचिनने आयसीसीच्या सहा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मास्टर-ब्लास्टर पहिल्यांदा 1992 वर्ल्ड कप आणि त्यानंतर 2011 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा खेळला. या वर्ल्ड कपमध्ये अनुभवीने दिग्गजाने 56.95 च्या सरासरीने 2278 धावा केल्या असून त्यात सहा शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
3. सचिनने वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता आणि हा आणखी एक विक्रम आहे जे मोडणे जवळपास अशक्य आहे. 2002-03 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 673 धावा केल्या होत्या.
4. 1998 मध्ये सचिन आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. यावेळी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये संपूर्ण वर्षात 1894 धावा केल्या होत्या ज्या आजपर्यंत वनडे सामन्यात तेवढ्या धावा कोणालाच करता आलेल्या नाही.
5. सचिनच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके ज्याच्या जवळ आवर कोणताही फलंदाज पोहचू शकलेला नाही. सचिनच्या विक्रमाच्या जवळ रिकी पॉन्टिंग आहे ज्याने 41 कसोटी शतके केली आहेत.