GT vs PBKS (Photo Credit -X)

GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 17 वा सामना आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाब किंग्जसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर 7 गडी राखून पराभूत करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. यासह गुजरात टायटन्स 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या घरच्या मैदानावरील दोन्ही सामने जिंकले आहेत.

पंजाब किंग्जला स्पर्धेत पुनरागमन करायचे

आजच्या सामन्यातही गुजरात टायटन्स संघ विजयाच्या आशेने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे पहिला सामना जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्ज संघाचा विजयाचा मार्ग गारद झाला आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून पंजाब किंग्जला स्पर्धेत पुनरागमन करायचे आहे. (हे देखील वाचा: GT vs PBKS, IPL 2024: शिखर धवन आजच्या सामन्यात करु शकतो मोठा विक्रम, विराट कोहलीची करणार बरोबरी)

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी वेग आणि उसळी असेल आणि आउटफिल्डही वेगवान असेल. या स्टेडियममध्ये फिरकीपटूंना फारशी मदत मिळण्याची अपेक्षा नाही. लाल मातीच्या खेळपट्टीवर सामना खेळवला गेला तर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. इथली बाऊंड्री जरा मोठी आहे, त्यामुळे षटकार फारसा दिसत नसण्याची शक्यता आहे.

आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा असतील या दिग्गज खेळाडूंवर

शुभमन गिल : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल अद्याप मोठी धावसंख्या करू शकलेला नाही. शुभमन गिलचा पंजाबविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. शुभमन गिल या सामन्यात मोठी धावसंख्या करू शकतो.

उमेश यादव : गुजरात टायटन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने पंजाब किंग्जविरुद्ध आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत. या कालावधीत उमेश यादवने 34 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यातही उमेश यादव आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना चकवा देऊ शकतो.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे, साई सुदर्शन.

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग.