फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसन (Photo Credit: PTI)

KXIP vs CSK IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) 10 विकेटने धुव्वा उडवून चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. चेन्नईचे सलामी फलंदाज फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांनी एकत्र येऊन सीएसकेला (CSK) शानदार विजय मिळवून दिला. दोघांनी मिळून 181 धावा केल्या. यासह आयपीएलमध्ये सीएसकेकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम फाफ आणि वॉटसन यांच्या नावावर झाला आहे. दोघांनी मुरली विजय (Murli Vijay) आणि माइक हसी (Mike Hussey) यांच्यातील 159 धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडला. पंजाबने दिलेल्या 179 धावांचे लक्ष्य सीएसकेने 17.4 ओव्हरमध्ये 181 धावा करून गाठले. वॉटसन 53 चेंडूत 83 धावांवर नाबाद राहिला तर फाफने 53 चेंडूत 87 धावा केल्या. इतकंच नाही तर आत्ताच्या सामन्यात दोन्ही टीममध्ये एक योगायोग घडले. (KXIP vs CSK, IPL 2020: फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसनच्या दमदार अर्धशतकांनी मोडली CSKच्या पराभवाची मालिका, किंग्स इलेव्हन पंजाबचा 10 विकेटने दारुण पराभव)

सीएसकेने यापूर्वी 2013 मध्ये 10 विकेटने विजय मिळवला होता. तेव्हा देखील त्यांच्यासमोर किंग्स इलेव्हन पंजाबची टीम होती. याशिवाय, दुबई येथे यंदा दुसऱ्या डावात फलंदाजी करून विजय मिळवणारा सीएसके पहिला संघ बनला आहे. दरम्यान, वॉटसन आणि डु प्लेसिस यांच्यातील आजची भागीदारी आयपीएलमधील सलामीची ही चौथी मोठी भागीदारी आहे. आयपीएलच्या इतिहासात एकही विकेट न गमावता टीमने मिळवलेले हे दुसरे सर्वात मोठे लक्ष्य आहे. एकही विकेट न गमावता सर्वाधिक धावांचे लक्ष्य साध्य करण्याचा विक्रम केकेआरच्या नावे आहे. 2017 मध्ये केकेआरने गुजरात लायन्सचे 184 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता यशस्वीपणे गाठले होते. केकेआरकडून त्या वेळी गौतम गंभीर आणि क्रिस लिनच्या सलामी जोडीने 184 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता गाठले होते.

दरम्यान, आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली आणि सीएसके विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले. सीएसकेच्या दोन्ही सलामी फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि सहजपणे 10 विकेट आणि 14 चेंडू शिल्लक असताना यशस्वी लक्ष्य गाठले. वॉटसन 83 आणि डु प्लेसिस 87 धावा करून नाबाद परतले. वॅट्सने त्याच्या खेळीत 11 चौकार व 3 षटकार तर डु प्लेसिसने 11 चौकार व 1 षटकार लगावला.