Vaibhav Suryavanshi (Photo Credit- X)

IND U19 vs AUS U19: भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पहिल्याच वनडे सामन्यात त्याने २४ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. वैभवच्या या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने २२६ धावांचे लक्ष्य ११७ चेंडू आणि ७ विकेट्स बाकी असतानाच गाठले. IND vs PAK: पाकिस्तानच्या पत्रकाराला सूर्यकुमार यादवचे सडेतोड उत्तर; म्हणाला, “आता ही कोणतीही ‘प्रतिस्पर्धा’ राहिली नाही”

ऑस्ट्रेलियातील कामगिरी

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्धच्या सामन्यात नेहमीच्या शैलीत सलामीला येत केवळ २२ चेंडूत ३८ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याच्या या दमदार सुरुवातीमुळे भारताने अवघ्या ५ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडला. वैभवच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने विजय सहज नोंदवला.

आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

वैभवने गेल्या काही काळात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये आणि नंतर भारतीय अंडर-१९ संघासाठी केलेल्या तुफानी कामगिरीमुळे तो चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. आयपीएल २०२५ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी ७ सामन्यांत ३६ च्या सरासरीने आणि २०६.५५ च्या स्ट्राइक रेटने २५२ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने एक शतकही झळकावले होते. यापूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यावरही वैभवने अंडर-१९ संघासाठी ५ वनडे सामन्यांत ७१ च्या सरासरीने ३५५ धावा चोपून काढल्या होत्या आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

२०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकाची तयारी

भारतीय अंडर-१९ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वनडे आणि २ युथ टेस्ट सामने खेळणार आहे. २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. या विश्वचषकात वैभव सूर्यवंशीचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्याला अधिकाधिक अनुभव मिळाल्यास त्याचा फायदा त्याला आणि भारतीय संघालाही नक्कीच होईल.