DC vs MI, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आणि दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 111 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 9 विकेटने मोठा विजय मिळवला. मुंबईसाठी ईशान किशन (Ishan Kishan) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने दिल्लीचा खेळ खल्लास केला आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. ईशान नाबाद 72 आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाबाद 12 धावा तर डी कॉकने 26 धावा केल्या. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला. दिल्ली आणि मुंबई यांच्यातील आजच्या सामन्यात विजय मिळवून रेकॉर्ड आयपीएल विजेत्या 18 गुणांसह पॉईंट्स टेबलवरील पहिले स्थान कायम ठेवले आहे, तर दिल्लीच्या आजच्या पराभवामुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर बनला आहे. दिल्लीचे 13 सामन्यात 14 गुण असून ते पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊ दिले नाही. त्यानंतर ईशान किशनच्या अर्धशतकच्या बळावर मुंबईने दिल्लीवर मात केली. (India Tour Of Australia 2020-21: रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठी माहिती, BCCI मेडिकल टीम रविवारी करणार ओपनरच्या फिटनेसचे मूल्यांकन)
दिल्लीने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात ईशान आणि डी कॉकच्या जोडीने शानदार सुरुवात करत 68 धावांची भागीदारी केली. पण, एनरिच नॉर्टजेने मुंबईला एकमेव झटका देत विकेटकीपर-फलंदाज डी कॉकला बोल्ड केले. डी कॉक आजच्या सामन्यात 26 धावत करू शकला. अखेरीस ईशान आणि सूर्यकुमारने मुंबईला विजयीरेष ओलांडून दिली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजच्या विजयाने मुंबईचे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून पुढील सामन्यात पराभव झाल्यासही पहिले स्थान निश्चित झाले आहे.
यापूर्वी, मुंबईने टॉस जिंकून दुबई स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 13व्या सत्राच्या प्ले-ऑफचं तिकीट मिळवल्यानंतरही दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दिल्लीला 110 धावांवर रोखलं आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत दिल्लीच्या धावसंख्येवर ब्रेक लगावला. प्ले ऑफसाठी आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी दिल्लीला विजय मिळवणे गरजेचे होते, मात्र दिल्लीचा एकही फलंदाज मुंबई गोलंदाजांना आव्हान देऊ शकला नाही.