CSK vs RCB IPL 2021: टेबल टॉपर्स विराट आणि धोनी यांच्यात होणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी? पहा कोण ठरलंय कोणावर भारी
एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

CSK vs RCB IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल-14 च्या 19व्या सामन्यात टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दुसर्‍या स्थानावरील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. आरसीबीने (RCB) चार पैकी सर्व जिंकले आहेत तर सीएसकेने (CSK) चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, पण चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्स विरोधात कठीण आव्हानाला सामोरे जावे लागले होते. 31 धावांवर पाच विकेट गमावूनही केकेआरने 202 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यांना फक्त 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. शिवाय, आरसीबीने मागील चारही सामने जिंकले असल्यामुळे चेन्नई त्यांचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. अशास्थितीत दोन्ही संघांपैकी कोणती टीम कोणावर भारी पडली याबाबत जाणून घेणार आहोत. (RCB vs RR IPL 2021: Virat Kohli ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा RCB कर्णधार ठरला पहिलाच फलंदाज!)

आयपीएलच्या 13 मोसमात बेंगलोरवर चेन्नई संघाचं पारडं जड दिसत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सीएसके टीम आरसीबी विरोधात अधिक सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात दोन्ही संघ 27 वेळा भिडले आहे ज्यामुळे चेन्नईने 17 वेळा तर आरसीबीने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. शिवाय 1 सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, तटस्थ ठिकाणी दोघे 10 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 6 सामन्यात बेंगलोरवर मात केली तर आरसीबीला 4 सामने जिंकण्यात यास आले आहे. शिवाय, आरसीबी संघासाठी सध्या विराट कोहलीने सीएसकेविरुद्ध 26 सामन्यांत 42.23 च्या सरासरीने 887 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आठ अर्धशतके देखील केली आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी एमएस धोनीने रॉयल चॅलेंजर्स विरोधात 30 सामन्यात 39.71 च्या सरासरीने सर्वाधिक 834 धावा केल्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2021 आवृत्तीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सलग चार सामने जिंकणारा एकमेव संघ आहे. शिवाय, राजस्थान रॉयल्सवर (आरआर) 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (सीएसके) पुढील सामन्याआधी आरसीबी आत्मविश्वासावर उंचावला असेल. दुसरीकडे, सुपर किंग्जचा सहभाग असलेल्या संघांमधील नेट रनरेट (1.142) सर्वात चांगला आहे आणि सलग चौथा विजय त्यांना गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून देऊ शकते.