S Sreesanth(ANI)

भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत (S Sreesanth) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीसंतविरुद्ध केरळमध्ये गुन्हाही दाखल केला आहे. यामध्ये श्रीसंतसोबत त्याच्या दोन जवळच्या मित्रांचीही नावे आहेत. उत्तर केरळ जिल्ह्यातील एका व्यक्तीने दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सरिश गोपालन यांनी आरोप केला आहे की, आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी श्रीसंतच्या सहकार्याने स्पोर्ट्स अकादमी स्थापन करण्याचा दावा करून 25 एप्रिल 2019 पासून वेगवेगळ्या तारखांना 18.70 लाख रुपये उकळले.

ही अकादमी कर्नाटकातील कोल्लूर येथे बांधली जाणार होती. सरिशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला अकादमीचा भागीदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती, ज्यासाठी त्याने पैसे गुंतवले. मात्र याबाबत त्याची फसवणूक झाली. आता या प्रकरणी एस श्रीसंत आणि इतर दोघांविरुद्ध आयपीसी कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीसंतचा उल्लेख करण्यात आला आहे.

श्रीसंत हा T-20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. श्रीसंतने भारताकडून 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर आयपीएलच्या 44 सामन्यांत 40 विकेट आहेत. दरम्यान, वादात अडकण्याची श्रीसंतची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2008 मध्ये त्याचा हरभजन सिंगसोबत वाद झाला होता. (हेही वाचा: Team India New Coach: व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक होण्याची शक्यता - अहवाल)

यासह 2013 च्या आयपीएल दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज श्रीसंत आणि त्याचे दोन सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्वजण आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. बोर्डाच्या तपासणीत सर्व आरोप खरे ठरले आणि श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली. मात्र, 2015 मध्ये दिल्ली न्यायालयाने श्रीशांतला 'मकोका' कायद्यांतर्गत स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवरील बंदी सात वर्षांची केली. बंदी उठल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व केले.