भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे चाहते केवळ भारताच नव्हे तर, जगभरात आहेत. विशेष असे की या चाहत्यांमध्ये केवळ सर्वसामान्य व्यक्तिच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. विराटच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia Prime Minister Scott Morrison ) यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी याची प्रचिती आली. या वेळी झालेल्या चर्चेत ऑस्ट्रेलियाच्या क्रीडामंत्री ब्रिजेट मॅकेन्झी यासुद्धा विराटच्या जबरदस्त चाहत्या असल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने सिडनी कसोटी सामन्याआधी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी क्रीडामंत्री ब्रिजेट मॅकेन्झी यांनी भारतीय क्रिकेट संघाची ओळख पंतप्रधानांना करु दिली. ओळख करुन देता देता मॅकेन्झी जेव्हा विराट कोहलीजवळ आल्या तेव्हा त्या काहीशा थबकल्या. त्यांनी थोडा पॉझ घेतला आणि त्या म्हणाल्या, 'हा मला चांगलाच माहिती आहे. मी याच्या खेळाच्या प्रेमात आहे. तो ज्या उत्साहाने खेळपट्टीवर उतरतो ते पाहणं म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. हा सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.', अशा शब्दात मॅकेन्झी बाईंनी विराटचे तोंडभरून कौतूक करत त्याच्या खेळावरील प्रेम व्यक्त केले. (हेही वाचा, क्रिकेट: 2019 मध्ये खेळाडूंचं हे त्रिकूट टीम इंडियातून करणार पदार्पण)
भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना सिडनीच्या मैदानावर पार पडणार आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ही आघाडी कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. तर, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारत मालिका खिशात घालणार की, ऑस्ट्रेलिया बरोबरी करणार याबाबत उत्सुकता आहे.