Chris Gayle (Photo Credit: Instagram/chrisgaylefans)

वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू 'ख्रिस गेल' (Chris Gayle)ने एकदिवसीय सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. जगभरात धडाकेबाज फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेला ख्रिस गेलचा झंझावात येत्या विश्वचषकाच्या (ICC World Cup 2019)खेळानंतर संपणार आहे. रविवारी रात्री उशिरा वेस्ट इंडिजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ख्रिस गेलच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यांमधून ख्रिस गेल निवृत्ती घेणार असला तरीही T 20 सामन्यांमध्ये ख्रिस गेल खेळणार आहे. सोशल मीडियामध्येही ख्रिस गेलच्या निवृत्तीच्या बातम्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 

निवृत्तीपूर्वी ख्रिस गेलला एका विक्रमाची संधी

सुमारे 20 वर्षांपूर्वी ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पदार्पण केलं. गेलने आजतागायत 284 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 9727 धावा बनवल्या आहेत. यामध्ये 23 शतकं, 49 अर्धशतकांचा समावेश आहे. गेलच्या पुढे ब्रायन लाराचं एकदिवसीय सामन्यांमध्ये 10405 धावांचा विक्रम आहे. गेलचा आगामी इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज या एकदिवसीय सामन्यामध्ये 5 सामन्यांच्या मालिकेपैकी पहिल्या दोन सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 10,000 धावांचा टप्पा पार करून वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर होऊ शकतो.

आयपीएलचा स्टार खेळाडू

इंडियन प्रिमियर लिगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघातून ख्रिस गेल खेळतो. 10 सीझनमध्ये सहभागी असणारा क्रिस गेल 112 मॅच खेळला आहे. यामध्ये त्याने 3994 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा ख्रिस गेल हा दुसरा विदेशी खेळाडू आहे.