नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Nagpur Crime Branch) शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) जामठा स्टेडियममधून चार कथित क्रिकेट बुकींना अटक केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना या स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मैदानावरील वास्तविक घडामोडी आणि त्यांचे थेट प्रक्षेपण यामधील अल्प कालावधीचे भांडवल करण्यासाठी स्टेडियमच्या बाहेरून पंटर्सना सामन्याची माहिती सामायिक करत होते. वास्तविक, थेट प्रक्षेपण आणि स्टेडियममधील थेट सामन्यात काही सेकंदांचा फरक असतो. हीच माहिती हे बुकी लीक करत होते. (हे देखील वाचा: Rohit Sharma ने शतक झळकावून अनेक विक्रम काढले मोडीत, सचिन तेंडुलकरची केली बरोबरी, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवागला टाकले मागे)
अटक करण्यात आलेले मुंबई, भंडारा आणि नागपूर येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 7 बाद 321 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या. या संदर्भात भारताने ऑस्ट्रेलियावर आतापर्यंत 144 धावांची आघाडी मिळवली आहे.