KL Rahul And Dhruv Jurel (Photo Credit - X)

Border Gavaskar Trophy 2024: न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बॉर्डर गावस्कर ट्राॅफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या मायदेशात झालेल्या या पराभवामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. बीसीसीआय आता ऑस्ट्रेलिया अ संघासोबतच्या दुसऱ्या सामन्यासाठी 2 वरिष्ठ खेळाडू ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. हे दोन्ही खेळाडू बॉर्डर गावसकर स्पर्धेसाठीच्या संघातही आहेत. (हे देखील वाचा: Border Gavaskar Trophy 2024: न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर 3 खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीवर संकट, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर घेऊ शकतात मोठा निर्णय)

केएल राहुल आणि ध्रुव जुरेल आधीच पोहचणार ऑस्ट्रेलियाला

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला सामना खेळला गेला आहे. ज्यामध्ये भारत अ ला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसरा सामना 7 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये केएल राहुल आणि ध्रुव जुरेल देखील खेळताना दिसणार आहेत. हे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग होते.

अवघ्या तीन महिन्यांतच कोचिंग स्टाफवर प्रचंड दबाव 

संघ व्यवस्थापन सर्व खेळाडूंना खेळण्याची पूर्ण संधी देऊ इच्छिते, विशेषत: राखीव खेळाडूंना, ज्यांना ऑस्ट्रेलियासोबत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कधीही खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका पराभवामुळे गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्याच्यावर प्रचंड दबाव आला आहे. गंभीरच्या कोचिंगमध्ये प्रथम टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला, त्यानंतर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला भारतात पराभूत केले. आता मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गंभीरला रणनीतीत थोडा बदल करावा लागेल.