BBL 2020-21: Sydney Sixers टीमचा ऐतिहासिक विजय, 206 धावांच्या प्रत्युत्तरात आरोन फिंचचे Melbourne Renegades 60 धावांवर ऑलआऊट
आरोन फिंच (Photo Credit: Getty Images)

BBL 2020-21: मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध (Melbourne Renegades) बिग बॅश लीगच्या (Big Bash League) नुक्त्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने (Sydney Sixers) लीगमधील सर्वाधिक धावांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. सिक्सर्सने पहिला फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 205 धावांचा डोंगर उभारला, पण मेलबर्न संघ तो पार करण्यास अपयशी ठरला आणि आरोन फिंचचा (Aaron Finch) संघ अवघ्या 10.4 ओव्हरमध्ये 60 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे सिडनी सिक्सर्सने 145 धावांनी बीबीएल (BBL) इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. सिडनीकडून जोश फिलिपने (Josh Phillipe) सर्वाधिक 95 धावा केल्या तर जोडर्न सिल्कने (Jordan Silk) अखेरीस नाबाद 45 धावा केल्या. डॅनियल ह्यूजेसने (Daniel Hughes) 32 तर जेम्स विन्सने 17 धावांचे योगदान दिले आणि संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. दुसरीकडे, पीटर हॅटझोग्लूला 2 तर जोश ललोर आणि केन रिचर्डसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (BBL 2020-21: डार्सी शॉर्टने राशिद खानच्या ओव्हरमध्ये चोपल्या 24 धावा, नंबर-1 टी-20 बॉलरने बाउंड्री लाईनवर घेतला थरारक कॅच, पाहा Videos)

मेलबर्नकडून लक्ष्याच्या प्रत्युत्तरात एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. चार खेळाडू भोपळाही फोडू शकले नाही तर शॉन मार्शने 13 आणि कर्णधार फिंचने 12 धावा केल्या. याशिवाय, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. अन्य सिडनी गोलंदाजांच्या कहरपुढे ढेर झाले आणि दुहेरी धावसंख्या पार करू शकले नाही. सिडनीसाठी बेन द्वारशुईसने 4, स्टीव्ह ओकिफला 3, कार्लोस ब्रेथवेट 2 आणि गुरिंदर संधूला 1 विकेट मिळाली. सिडनीचे गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत राहिल्याने मेलबर्न संघावर दबाव वाढत राहिला आणि फिंचच्या नेतृत्वातील संघ स्पर्धेतील दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला. यापूर्वी 2015 मध्येरेनेगेड्सना मेलबर्न स्टार्सविरुद्ध 112 धावांनी पराभव पत्करावा लागला होता जो की यापूर्वी स्पर्धेतील सर्वात मोठा विजय होता.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे रिचर्डसनच्या 13 धावांनीरेनेगॅड्सला स्टार्सविरुद्ध 2015 सर्वात कमी धावसंख्येला, 57, मागे टाकण्यास महत्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, मोसमातील पहिल्या विजयासाठी गतविजेत्या सिडनी सिक्सर्ससाठी फलंदाजी करताना जोश फिलिपचे अवघ्या 5 धावांनी शतक हुकले आणि सलामी फलंदाज 95 धावांवर माघारी परतला. फिलीपला टॉप गिअरमध्ये जाण्यासाठी धडपड करावी लागली आणि 24 धावांवर त्याला जीवनदानही मिळाले. फिलिपने स्टँड-इन कर्णधार डॅनियल ह्यूजेससह 78 धावांची भागीदारी आणि सिल्कसोबत पाच ओव्हरमध्ये 70 धावांची भागीदारी केली.