चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचे (Asian Games 2023) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेबरोबरच पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेचाही आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली आहे. गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघांना आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रत्येकी तीन सामने जिंकावे लागतील. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट 19 सप्टेंबरपासून सुरू झाले. भारतीय संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीतच आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाचा सामना मलेशियाशी होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. आता उपांत्य फेरी 24 सप्टेंबरला तर अंतिम सामना 25 सप्टेंबरला होणार आहे. हे तीन सामने जिंकताच टीम इंडिया सुवर्णपदकावर कब्जा करेल.
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेने आता उपांत्य फेरी गाठली आहे. श्रीलंकेच्या महिला संघाने थायलंडचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. तर बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यातील सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि क्रमवारीच्या आधारे बांगलादेशला उपांत्य फेरीचे थेट तिकीट मिळाले. उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ पाकिस्तान आहे.
टीम इंडिया उपांत्य फेरीत कधी आणि कोणाशी भिडणार?
भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी 24 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशशी भिडणार आहे, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill: शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, तोडू शकतो सचिन तेंडुलकरचा 'हा' खास विक्रम)
टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व सामना खेळणार
27 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पहिला सामना नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात होणार आहे. टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. टीम इंडिया 3 ऑक्टोबरला उपांत्यपूर्व फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाला सुवर्णपदक जिंकण्यासाठी फक्त तीन सामने जिंकावे लागतील. उपांत्यपूर्व फेरीनंतर उपांत्य फेरीचा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल. तिसर्या क्रमांकासाठीचा सामनाही त्याच दिवशी होणार आहे.